Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अस्मितेच्या नावावर काही पुरोगाम्यांनी नामांतराला विरोध केला पण कालांतराने सामाजिक प्रबोधनामुळे विरोध कमी झाला : डॉ. एम.ए.वाहूळ

Spread the love

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढाईत प्रारंभी  खऱ्या अर्थाने दलित-दलितेतरांचा मोठा सहभाग होता परंतु या  लढाईच्या वेळी पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही लोकांनी अस्मितेच्या नावावर विद्यापीठाच्या नामांतराला विरोध करून, पहिल्यांदा जेंव्हा १९७८ मध्ये विद्यापीठ नामांतराचा ठराव दोन्हीही सभागृहात पास करून जेंव्हा नामांतर केले तेंव्हा  नामांतराला विरोध करणाऱ्या पुरोगाम्यांनी मराठवाड्यात हिंसक आंदोलन घडवून  दलित-दलितेतर दरी निर्माण करण्याच्या प्रयत्न केला परंतु अखेरच्या  टप्प्यातील सामाजिक प्रबोधनामुळे नामांतर विरोध कमी झाला आणि पर्यायाने मराठवाड्यातील जनतेने नामविस्ताराचा स्वागत केले असे प्रतिपादन माजी प्राचार्य  डॉ. एम. ए. वाहूळ यांनी केले.

नांदेड येथील युवा संशोधक डॉ. प्रमोद वाघमारे यांनी लिहिलेल्या “ऐतिहासिक नामांतर लढा” या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभप्रसंगी डॉ. एम. ए. वाहूळ  बोलत होते. येथील पीपल्स महाविद्यालयात हा ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता.  डॉ. विजयकुमार माहुरे होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पीपल्स  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. एम.जाधव,  उपप्राचार्य डॉ.  बी.डी . कोपलवार , डॉ. आदिनाथ इंगोले, अर्जुन वाघमारे, निर्मलकुमार सूर्यवंशी आदींची उपस्थित होती.

यावेळी  बोलताना डॉ.वाहूळ पुढे म्हणाले कि , १९५८ मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेवेळीच  या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे असा विचार पुढे आला होता परंतु व्यक्तीचे नाव विद्यापीठाला  देण्याची प्रथा नसल्याने विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याच्या प्रस्थावला  विरोध करण्यात आला, मात्र त्यानंतर काही विद्यापीठांना व्यक्तिवाचक नावे दिल्यामुळे विद्यापीठ नामांतराचा विषय पुन्हा चर्चेत आला.  विद्यार्थीदशेत चळवळीत असताना  आपण तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे १९७४  मध्ये पहिल्यांदा मराठवाड्यातील दोन विद्यापीठांपैकी विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे अशी मागणी केली होती . दरम्यान  वसंतराव नाईक यांचे मुख्यमंत्रिपद गेल्याने त्या प्रश्नांची तड लागली नाही पुढे १९९४ पर्यंत नामांतर आंदोलन सुरू होते . या आंदोलनात अनेकांना मोठी किंमत चुकवावी लागली मात्र काळाच्या ओघात दलित-दलितेतर हा वाद मागे पडून दोन्ही घटकांनी मिळून नामांतराचा लढा पुढे नेला त्यातून १४ जानेवारी १९९४ रोजी विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला त्याचे मराठवाड्यातील जनतेने स्वागत केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. अविनाश पाटील, राजेश जांभळे, प्रा. डॉ. मारुती शिंदे, विनोद वाघमारे,  संदीप लोहगावकर,  प्रकाश वाघमारे,  राजरत्न ढोले,  दिनेश वाघमारे,  रामचंद्र जुलुरी ,  रजनीकांत गोरे,  आशुतोष कांबळे आदींनी परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!