Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद , शिर्डीकर रविवारपासून बंदच्या तयारीत

Spread the love

असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद आणखी चिघळण्याचे चिन्ह असून या प्रकरणाच्या निषेधार्थ संतप्त शिर्डीकरांनी येत्या रविवारीपासून शिर्डी बंदची हाक दिली असल्याचे वृत्त आहे. या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी ग्रामस्थांनी शनिवारी तातडीची ग्रामसभा बोलावली होती हे समजताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने लक्ष घातले असून शिर्डी ग्रामस्थांशी ते चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौ-यावर असताना काही लोकांनी साईबाबांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केल्यानंतर साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच्या विकासासाठी राज्य सरकारने विकास आराखडा तयार केला असून त्याचे भूमिपूजन लवकरच केले जाईल अशी घोषणा केल्यानंतर देश विदेशातील साईभक्तांमध्ये मोठी खळबळ माजली आहे तसंच शिर्डी ग्रामस्थही आक्रमक झाले आहेत.

शिर्डीकरांच्या मतानुसार साईबाबांचा जन्म,धर्म याबाबत साईचरित्रात स्पष्ट लिहलेले असतानाही अनेक ठिकाणी साईबाबांच्या जन्मस्थानाचा दावे केले जात असून त्यातून साईबाबांच्या सर्वधर्म समभावाच्या विचारालाच नख लावण्याचा प्रयत्न होत आहे. काही लोकांनी तर साईबाबांना विशिष्ट धर्मात अडकवण्याचा प्रयत्न केला असून तो निंदनीय असल्याची शिर्डीकरांची भावना आहे. साईबाबांनी आयुष्यभर फकिराच्या वेशात राहुन दिनदुबळ्यांची सेवा केली. जगाला सर्व धर्मसमभावाची शिकवण दिली . आपला धर्म ,पंथ ,जन्म याबाबत कोठेही वाच्चता  केली नाही . साईबाबांच्या जीवन कार्याबद्दल साईसतचरित्र हाच एकमेव दस्तावेज असून त्यात कुठेही साईंच्या जन्मस्थळाचा अथवा ते कोणत्या जातीचे होते याबाबत कुठेही नोंद नाही, असे असतानाही पाथरी येथील काही प्रवृत्ति साईबाबा विशिष्ट जातीचे असल्याचा दावा करून साईभक्तांच्या भावनेला व साईबाबांच्या विचारधारेला नख लावण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या कडे साईबाबांच्या जन्मस्थळाचा कोणताही अधिकृत पुरावा नसताना सरकार साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून  पाथरीचा विकास करण्याचा आक्षेप साईभक्त शिर्डीकरांनी घेतला आहे.

पाथरी येथील  साईबाबांच्या कथित जन्मस्थळाच्या उल्लेखावरून साईभक्त आणि शिर्डी ग्रामस्थांमध्ये असंतोष उसळला असून आज गुरूवारी शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थांची बैठक झाल्यानंतर साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणा-या पाथरी आणि अन्य ठिकाणच्या तथाकथित लोकांचा तीव्र निषेध करुन यापुढे साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणा-यांचा सरकारने बंदोबस्त करावा यासाठी येत्या रविवारपासून  बेमुदत शिर्डी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापूर्वीच मुख्यमंत्री यातून मार्ग काढतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!