Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : काँग्रेसच्या टीकेनंतर इंदिरा गांधी -करीम लाला भेटीचे वक्तव्य संजय राऊत यांनी घेतले मागे

Spread the love

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व कुख्यात डॉन करीम लाला यांच्या भेटीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्यासंदर्भात केलेले वक्तव्य मागे घेतलं आहे. महाविकास आघाडीवर आपल्या वक्तव्याचा परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी हा सावध पवित्रा घेतला आहे. ‘इंदिरा गांधी यांच्याबद्दल मी केलेल्या वक्तव्यामुळं कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी वक्तव्य मागे घेतो,’ असं त्यांनी आपल्या खुलाशात म्हटलं आहे.

आपल्या मुलाखतीत बोलताना , ‘मुंबईतील अंडरवर्ल्ड हे शिकागोच्या अंडरवर्ल्डपेक्षा अधिक भयंकर होतं. त्या काळात गुंडाला भेटायला अख्खं मंत्रालय खाली येत असे. करीम लालाला भेटण्यासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या, पायधुणीला…’ असं वक्तव्य राऊत यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. त्यावरून काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत संजय राऊत यांच्यावर टीका केली होती आणि राऊत यांनी हे वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा केला होता. मात्र, त्यानंतरही वाद थांबला नाही. त्यामुळं अखेर राऊत यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे.

‘खरंतर काँग्रेसच्या मंडळींनी माझं वक्तव्य मनाला लावून घेण्याची गरज नव्हती. मी आजवर अनेकदा इंदिरा गांधी यांच्या भूमिकांचं समर्थन केलेलं आहे. तरीही माझ्या वक्तव्यानं इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला तडा गेला असेल किंवा कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझं वक्तव्य मागे घेतो,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

माजिद मेमन 

दरम्यान  राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अॅड. माजिद मेमन यांनी मात्र राऊत यांच्या वक्तव्यात फारसं काही आक्षेपार्ह नसल्याचं म्हटलं आहे. मेमन यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. ‘संजय राऊत यांनी इंदिराजींचा अपमान केलेला नाही. उलट त्यांनी इंदिराजींची प्रशंसाच केलेली आहे. करीम लालाच्या संदर्भातील वक्तव्यावरून काँग्रेसनं फार आक्रमक होण्याची गरज नाही. करीम लाला व हाजी मस्तानसारख्या गुंडाना सार्वजनिक माफी देण्यात आली होती, हे काँग्रेसनं विसरू नये, असं मेमन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बाळासाहेब थोरात 

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व कुख्यात डॉन करीम लाला यांच्या भेटीबद्दलच्या वक्तव्यावरून काँग्रेसचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. ‘संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य चुकीचंच होतं. यापुढं असं वक्तव्य खपवून घेतलं जाणार नाही,’ असं थोरात यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ‘संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळं आम्ही नाराज होतो आणि आहोत. ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली आहे. राऊत यांनी वक्तव्य मागे घेतल्यानं आता विषय संपलाय. मात्र, यापुढच्या काळात आम्ही हे खपवून घेणार नाही,’ असं थोरात म्हणाले. दरम्यान राऊत यांच्या वक्तव्याचा आधार घेत भाजपनं काँग्रेसला घेरलं होतं. काँग्रेसचे अंडरवर्ल्डशी संबंध होते का? काँग्रेसला अंडरवर्ल्डकडून पैसा यायचा का? याचं उत्तर काँग्रेसनं द्यावं, अशी मागणी भाजपनं केली होती. त्याबाबत विचारलं असता, ‘मुळात जे वक्तव्यच चुकीचं आहे. त्यावर स्पष्टीकरण कसलं द्यायचं,’ असं थोरात म्हणाले.


शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही करीम लालासोबत छायाचित्रे

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा माफिया डॉन करीम लाला याला भेटायला मुंबईत पायधुणीला जात असत या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे वादंग उठले असताना, करीम लाला याच्या नातवाने केलेल्या नव्या वक्तव्यामुळे हा वाद अधिकच पेटण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. करीम लाला यांच्या कार्यालयात इंदिरा गांधी यांच्या भेटीची छायाचित्रे तर आहेतच, मात्र, त्या फोटोंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही करीम लालासोबत छायाचित्रे आहेत, अशी माहिती करीम लालाचा नातू याने दिली आहे. एका वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!