Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विदेशात गेलेला पती परत यावा म्हणून पत्नीचे सासुरवाडीत केले अनोखे आंदोलन , येत कसा नाही आलाच पाहिजे…

Spread the love

औरंगाबादच्या वैजापूर मध्ये एक अनोखे आंदोलन करण्यात आले. अमेरिकेत राहणारा पती भारतात का येत नाही, याकाळात सासरचे लोक सव्वा वर्षापासून पतीसोबत संपर्क होऊ देत नाहीत, असा आरोप करत सासऱ्याचे घर व दुकानासमोर एका महिलेने सोमवारी उपोषण केले. तिच्यासोबत बसून तिला माहेरच्या मंडळींनीही  पाठिंबा दिला. ऐन आठवडी बाजारादिवशीच हा प्रकार घडल्याने हे अनोखे आंदोलन बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली. या आंदोलनामुळे शहरातील प्रतिष्ठित कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान, अमेरिकेत असलेला पती फेब्रुवारी महिन्यात भारतात घरी परत येणार आहे. तो आल्यानंतर पती-पत्नीमध्ये असलेला वाद मिटवून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सासऱ्याने दिल्यानंतर सुनेने त्यांच्या घर व दुकानासमोर सुरू केलेले उपोषण मागे घेतले.

या विषयी अधिक माहिती अशी कि , औरंगाबाद येथील विजयकुमार डहाळे यांची मुलगी प्राजक्ता यांचे सहा मे २०१८ रोजी वैजापूर येथील प्रसिद्ध सराफ सचिन हरिभाऊ उदावंत यांचा मुलगा सत्यजीत यांच्यासोबत लग्न झाले आहे. सत्यजीत हे अमेरिकेत वास्तव्यास असून तेथे नोकरी करतात. लग्नानंतर प्राजक्ता या अमेरिकेत पती सत्यजीत सोबत चार महिने राहिल्या. मात्र, नोव्हेंबर २०१८मध्ये पती त्यांना वैजापूर येथे सोडून अमेरिकेत निघून गेला. तेव्हापासून त्यांनी पत्नीशी संपर्क केलेला नाही. याला सासरची मंडळी जबाबदार असल्याचा आरोप करत प्राजक्ता यांनी सासऱ्याच्या दुकानासमोर उपोषण व आंदोलन सुरू केले.

दरम्यान सासरची मंडळी आपणास वारंवार घरात कोंडून ठेवतात, मानसिक त्रास देतात, तसेच पतीशी संपर्क होऊ देत नाहीत, असा आरोप प्राजक्ता यांनी केला आहे. याला सासरा सचिन हरिभाऊ उदावंत, सासू सुशीला, दीर सागर व जाऊ हे जबाबदार असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पोलिस निरीक्षक यांच्याकडे करण्यात आली. मात्र उपयोग झाला नाही. त्यामुळे पती भारतात परत घरी येईपर्यंत वैजापूर येथील दुकानासमोर प्राजक्ता यांनी उपोषण व धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.

या आंदोलनात त्यांच्या माहेरचे नातेवाईकही सामील झाले. प्राजक्तांच्या आंदोलनास टायगर ग्रुप, सेवा समिती, अखिल सुवर्णकार संघटना, मराठा समाज जागृती मंडळ, नरहरी सेना, औरंगाबाद जिल्हा व शहर सराफ सुवर्णकार फेडरेशन यांनी पाठिंबा दिला. यावेळी उपोषणास बसलेल्या नातेवाईकांनी उदावंत कुंटुबाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. या उपोषणात जाकेर शेख, मीनाताई सोनार, सुधाकर टाक, विजय डहाळे, भगवान शहाणे, मुकुंद नागरे, धनंजय पळशेरकर, भगवान उदावंत, अनिता शहाणे आदी सहभागी झाले होते.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!