Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

” आज के शिवाजी -नरेंद्र मोदी ” भाजप नेत्याच्या पुस्तकावरून गदारोळ , महाराष्ट्रातील नेते पेटले….

Spread the love

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या एका पुस्तकाचे भाजपच्या कार्यालयात प्रकाशन करण्यात आले आहे. ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ असे या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तक प्रकाशनानंतर देशभरातून भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे. तात्काळ या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी या मागणीसह सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला जात आहे.

भाजप नेते जयभगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिले आहे. भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले. दिल्लीमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने धार्मिक सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन केले होते. पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आल्यानंतर जय भगवान गोयल यांनी याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. त्यांच्या या ट्विट नंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

सोशल मीडियावर या पुस्तक प्रकाशनाचे वृत्त  व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय आहेत. त्यांच्याशी तुलना होऊ शकणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही आणि येणारही नाही. या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सोशल माध्यमातून केली जात आहे. मोदींची तुलना थेट छत्रपती शिवरायांसोबत करण्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर आक्षेप घेतला आहे. जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे. आव्हाडानंतर काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनीही यावर आक्षेप घेत भाजपने शिवरायांचा अपमान केला आहे, असे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याप्रकरणी विरोधकांनी भाजपवर एकच हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदार संजय राऊतांची तक्रार केली आहे.

भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिलेलं ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचं प्रकाशित करण्यात आलं. यावर संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे  आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांना सवाल केला होता. त्यांच्या या प्रश्नामुळे संभाजीराजे चांगलेच संतापले. संभाजीराजे यांनी ट्वीट करून थेट संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.  “उद्धवजी त्या संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करताय. त्यांनी आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंती निमित्त सिंदखेड राजामध्ये काय बोललो आहे ते, अशी त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.

काय म्हणाले होते संजय राऊत?

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे  आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांना सवाल केला. “शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली, हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का?,” असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!