Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

उस्मानाबादेत साहित्याची मांदियाळी , ९३ व्या अ . भा . साहित्य संमेलनाला प्रारंभ , महानोरांना धमकावणाऱ्यांना संभाजी ब्रिगेडने दिला इशारा

Spread the love

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा, उस्मानाबाद यांच्या वतीने आयोजित  ९३ व्या    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास आज, शुक्रवारी उस्मानाबाद  येथे प्रारंभ होत असून, रविवारपर्यंत चालणाऱ्या या साहित्य सोहळ्यासाठी उस्मानाबादचे यजमान सज्ज झाले आहेत. नियोजित संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या नावाला काही कडव्या संघटनांचा विरोध असल्यामुळे संमेलन परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

नियोजित संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि उदघाटक ना. धो. महानोर हे उस्मानाबादमध्ये दाखल झाले आहेत. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना  पाठदुखीचा तर महानोर यांना गुडघेदुखीचा त्रास होत आहे. आज, शुक्रवारी ते उद्घाटनास उपस्थित असतील. अध्यक्षीय भाषणही करतील. मात्र नंतर ते किती काळ संमेलनात थांबतील, ते त्यांच्या प्रकृतीवर अवलंबून राहील, असे सांगण्यात आले.

दरम्यान ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांना धमकावल्याच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने ब्राह्मण महासंघाला इशारा दिला आहे. ‘धमकी’ देणाऱ्या ब्राह्मण महासंघाच्या पांढऱ्या बगळयांनो..महानोर सरांच्या केसाला जरी हात लावला ना…तर महाराष्ट्रात तुम्हाला राहायला घर उरणार नाही आणि सांगायला डीएनए…! लक्षात ठेवा गाठ, आमच्या मावळ्यांशी आहे.’ अशा शब्दात संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे.

घोषित कार्यक्रमानुसार संमेलनाला शुक्रवारी सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडीने सुरुवात झाली . संत साहित्य आणि परिवर्तनवादी साहित्य मांडणारे ग्रंथ पालखीत असतील. सकाळी ११ वाजता ध्वजारोहण होईल. उद्घाटन कार्यक्रम सायंकाळी चार वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला नियोजित संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, उद्घाटक ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, साहित्य संमेलनाचे निमंत्रक नितीन तावडे यांची प्रमुख उपस्थिती असेल. यावेळी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस आणि लक्ष्मीकांत देशमुख यांचा सत्कार करण्यात येणार आहे. संमेलनासाठी राज्यभरातील प्रकाशनांची २०० दालने उभारण्यात आली आहेत.

या संमेलनाला राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोड, शिवसेना नेत्या नीलम गोरे यांच्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित असले तरी त्यांना व्यासपीठावर बसता येणार नाही अशी भूमिका महामंडळाने कायम ठेवली आहे. या मान्यवरांनी पहिल्या रांगेत बसून संमेलनाचा आनंद घ्यावा, असे संयोजकांनी सांगितले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!