Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात अखेर पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे निलंबित

Spread the love

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात पुणे मोटार परिवहन विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांना आज, गुरूवारी निलंबित करण्यात आले. त्यांच्या निलंबनाचे आदेश गृह विभागामार्फत देण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

निशिकांत मोरे यांच्याविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण अन्वेषणाधीन आहे. तसेच निशिकांत  मोरे यांच्याविरुद्ध पोलीस महासंचालक यांनी शासनास सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आज गृह विभागामार्फत शासन आदेश निर्गमित करुन श्री. मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

या बाबतची अधिक माहिती अशी कि , पोलीस उपमहानिरीक्षक मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप करणारी १७ वर्षीय मुलगी सोमवारपासून बेपत्ता होती. तिने  जाण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख केला होता. हे प्रकरण मिटवण्यासाठी कुटुंबावर दबाव टाकत असल्याचा उल्लेखही तिनं चिठ्ठीत केला होता. या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हाही नोंदवला आहे. आत्महत्या करण्यासाठी ती घरातून निघून जाणार होती. त्याचवेळी तिचं अपहरण करण्यात आलं आहे, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता.

या पीडित मुलीने लिहिलेल्या चिट्ठीत एखाद्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख  केला होता. डीआयजीसोबत एकेकाळी कर्तव्यावर असलेला पोलीस कॉन्स्टेबल कुटुंबीयांना धमकावत आहे, असा आरोपही  मुलीच्या भावाने  केला आहे. दिनकर साळवे असं कॉन्स्टेबलचं नाव असून, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकारी वाहनचालक असल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर साळवे यांनाही निलंबित करण्यात आलं आहे.

दरम्यान, डीआयजी मोरे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली आहे. मोरे यांच्याविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण गुन्हे शाखेकडे आहे. तसेच मोरे यांच्याविरुद्ध पोलीस महासंचालकांनी सरकारकडे सादर केलेल्या अहवालानुसार, शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. गृह विभागाकडून मिळालेल्या आदेशानुसार, मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, असंही देशमुख यांनी सांगितलं. दरम्यान, मोरे यांना पनवेल कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.  पीडित मुलगी ही तिच्या एका नातेवाइकासोबत उत्तर प्रदेशात गेल्याचं वृत्त आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!