Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाच्या फाईलवर रात्रीच सही न करण्याच्या वादातून शरद पवार आणि शिवसेनेकडून राज्यपालांवर टीकास्त्र

Spread the love

राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाच्या यादीवर स्वाक्षरी करण्याच्या वादावरून  राजभवन विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात कलगी तुरा रंगला असून यावर शिवसेनेच्या मुखपत्रातून राज्यपालांच्या भूमिकेवर टीका करण्यात आली आहे. दरम्यान राज्याच्या मंत्रिमंडळाच्या यादीवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. मात्र त्याआधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं राज्यपालांनी खातेवाटपावर सही करण्यास विलंब केल्याचा आरोप करत राज्यपालांविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच खातेवाटपावरून सही करण्यास राज्यपालांनी विलंब केल्याच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. ‘जे राज्यपाल पहाटे उठून राजभवनात देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना शपथ देतात व त्यासाठी राजभवन उघडे ठेवतात तेच राज्यपाल मंत्रिमंडळ खातेवाटपाच्या प्रस्तावावर सही न करता झोपायला जातात हे घटनात्मक आश्चर्यच म्हणायला हवे,’ असं शरद पवार यांनी म्हटल्याचं वृत्त शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’ या दैनिकात प्रकाशित करण्यात आलं आहे.

एक तर ‘महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा ३० डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतर मंत्र्यांना बंगला आणि दालनाचे वाटपही झाले. मात्र खातेवाटप अंतिम होत नव्हते. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये अनेक बैठकाही झाल्या नंतर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर खातेवाटप पूर्ण केले आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही यादी मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात आली. खातेवाटपाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मंजुरीसाठी रात्री ९.४५ वाजता राजभवनवर रवानाही करण्यात आली. राज्यपाल तत्काळ स्वाक्षरी करतील अशी अपेक्षा होती. मात्र राज्यपाल विश्रांती घेत असल्याने ते उद्या सकाळीच या यादीवर मंजुरीची स्वाक्षरी करतील असे सांगण्यात आले. राज्यपालांच्या ‘विश्रांतीयोगा’मुळे मंत्रिमंडळाचे खातेवाटप पुन्हा रखडले,’ अशी टीका शिवसेनेने केली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं खातेवाटपावरील शिक्कामोर्तबावरून राज्यपालांना लक्ष्य केल्यानंतर राजभवनावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा केला आहे. ‘खातेवाटपासंदर्भातील फाईल्स आमच्याकडे रात्री साडेनऊपर्यंत आली नव्हती. त्यामुळे स्वाक्षरी रात्री झाली नाही. फाईल आल्यावर स्वाक्षरी करून तात्काळ पाठवली,’ अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!