Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सायबर सुरक्षेसाठी तंत्रज्ञान वापरात सतर्कता महत्वाची – खा. इम्तीयाज जलील

Spread the love

इंटरनेटच्या युगात आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन आणि अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. त्याचे जसे लाभ आहेत तसेच काही धोकेसुद्धा आहेत, त्यापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी तंत्रज्ञान वापरतांना सतर्कता महत्वाची असल्याचे प्रतिपादन खा. इम्तियाज जलील यांनी आज येथे केले.

पोलीस आयुक्त कार्यालयात आज ‘सायबर सेफ वुमन’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली त्यावेळी खा. जलील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सर्वश्री आमदार हरीभाऊ बागडे, संजय शिरसाट, अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ ,पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद , पोलीस उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे,पोलीस निरिक्षक कैलास देशमाने उपस्थित होते.
यावेळी खा. जलील म्हणाले, पोलीस यंत्रणा अद्यावत तंत्रज्ञानाच्या साथीने सायबर क्षेत्रातील समस्यांवर तातडीने उपाययोजना राबवण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे. आपल्या पोलीस आयुक्तालयात अद्यावत सायबर सेल उत्तमरित्या कार्यरत आहे. त्यासोबतच पोलीसांप्रमाणेच प्रत्येक नागरीकाने आपली जबाबदारीही तितकीच महत्वाची आहे हे लक्षात घेऊन आपण वापरत असलेल्या तंत्रज्ञानाचा जपून वापर केला पाहीजे. जेणेकरून त्यातून पुढील काही समस्या, अपप्रकार निर्माण होणार नाही. अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर पुरेशा खबरदारीने केल्यामुळे निश्चित लाभदायक ठरेल. त्यासाठी सर्वांनीच इंटरनेट, स्मार्टफोन, संगणक वापर करताना सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे खा. जलील यावेळी म्हणाले.

आ. संजय शिरसाट
सायबर सेफ वुमन मोहीमेसारख्या मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालयातून आयोजन करणे उपयुक्त ठरणारे आहे, असे आ. अतुल सावे म्हणाले. इंटरनेटच्या चुकीच्या वापरामुळे आज सायबर गुन्हेगारीचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यासाठी तंत्रज्ञान वापराचे पुरेसे ज्ञान घेऊन मोबाईलचा अति वापर टाळणे तसेच इंटरनेटसेवा वापरताना योग्य ती काळजी घेणे आपल्या स्वत:च्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे मत आ. संजय शिरसाट यांनी व्यक्त केले.

आ. हरीभाऊ बागडे | महापौर घोडेले

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कायद्यांतर्गत चांगली तरतूद असून कायद्याची जरब बसणे आवश्यक आहे. त्यादुष्टीने इंटरनेट वापर, त्यातुन निर्माण होणारे संभाव्य धोके आणि उपाययोजना याबाबत जनजागृती मोहीम राबवली गेली पाहीजे असे मा. हरीभाऊ बागडे यावेळी म्हणाले. महापौर घोडेले यांनी सायबर क्षेत्रातील धोके आणि त्यासाठी पोलीसांव्दारे राबवण्यात येत असलेल्या उपाययोजना, घ्यावयाची खबरदारी याबाबत माहिती देणारा स्तुत्य उपक्रम पोलीस आयुक्तालयाने राबवल्याचे मत व्यक्त केले.

पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद

पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी २ ते ८ जानेवारी दरम्यान पोलीस रायजिंग सप्ताह आयुक्तालयामार्फत साजरा करण्यात येत असून त्यानिमित्त राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. उपआयुक्त मीना मकवाना यांनी डिजीटल साक्षरतेची आवश्यकता असून त्यासाठी आयुक्तालयामार्फत विविध जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाय राबवत असल्याची माहिती प्रास्ताविकात दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दृकश्राव्य संदेशाचेही प्रसारण करण्यात आले.
महिला व बालकांवर होणारे अत्याचार तसेच सायबर गुन्हे रोखण्यासाठी व या अत्याचारांसंदर्भात तसेच कायद्यांसंदर्भात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र सायबर, मुंबई यांच्याव्दारे तयार करण्यात आलेल्या पीपीटीचे सादरीकरण करून सहायक पोलीस निरीक्षक राहुल खटावकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी केले.
पोलीस आयुक्तालयाच्या वतीने या सप्ताहानिमित्त पोलीस यंत्रणेच्या सक्षमीकरणाची माहिती देणारे प्रदर्शन पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आले आहे. त्यालाही मान्यवरांनी यावेळी भेट दिली. यावेळी नागरिक, शाळा कॉलेज मधील शिक्षिका, विद्यार्थीनी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, महिला प्रतिनिधी, पोलीस ठाण्याच्या महिला दक्षता समितीच्या महिला सभासद ,पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!