Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भीमा कोरेगाव : प्रकाश आंबेडकर , अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांची मानवंदना , लाखोंचा जनसागर उसळला

Spread the love

आज भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला आहे . यावर्षी हा सोहळा शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांचा तगादा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान आज सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार , प्रकाश आंबेडकर यांच्यासह राज्याचे मंत्री नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विजयी स्तंभाला मानवंदना दिली.


असा आहे इतिहास….

नगर-पुणे महामार्गावर भीमा नदीच्या काठी वसलेल्या भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ रोजी महार रेजिमेंट आणि पेशवे यांच्या सैन्यात तुंबळ युद्ध होऊन या लढाईत महार बटालियनच्या ५०० सैनिकांनी पेशव्यांच्या २८००० सैनिकांना धारातीर्थी पाडून आणि सळो कि पळो करून विजय प्राप्त केला होता. या विजयाच्या प्रित्यर्थ महार रेजिमेंटच्या अनेक सैनिकांना वीर मरण आले. या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी १८२२ मध्ये भीमा कोरेगाव जवळ भीमा नदीच्या काठी हा विजयस्तंभ उभा केला. १९२७ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर याठिकाणी मानवंदना देण्यासाठी हजेरी लावत होते. त्यानुसार ही परंपरा आजतागायत चालू आहे. १ जानेवारी हा दिवस आंबेडकरी  अनुयायी “शौर्य” दिन म्हणून साजरा करतात. भीमा कोरेगाव येथे मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून लाखो लोक येत आहेत.
पेशव्यांच्या काळात महार आणि अस्पृश्य जातींना गुलामीच्या प्रचंड यातना सहन कराव्या लागत होत्या, त्यांना कुठलीही ही सन्मानाची वागणूक मिळत नव्हती. महारांच्या  लढाऊ सैनिकांनी पेशव्यांच्या सैन्यात प्रवेश द्यावा अशी विनंती महारांच्या वतीने सातत्याने करण्यात येत होती परंतु अस्पृश्यतेमुळे पेशव्यांनी महार सैनिकांना आपल्या सैन्यामध्ये कधीही प्रवेश दिला नाही,  याउलट शिवाजी महाराजांच्या सैन्यांमध्ये मात्र महार जातीच्या सैनिकांनी स्वराज्याच्या स्थापनेत आपले बलिदान दिले होते . महार समाजाचे हे शौर्य लक्षात घेऊन ब्रिटिशांनी महार रेजिमेंट स्थापन करून त्यांना आपल्या सैन्यात मानाचे स्थान दिले.  स्वतंत्र भारतातही “महार रेजिमेंट” च्या विजयाचा स्वतंत्र इतिहास आहे. “यशसिद्धी” हा महार रेजिमेंट मंत्र आहे.


या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले कि , मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्यावेळी काही लोकांनी दंगली घडवल्या. आताही सत्ता बदलल्याने राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्याचा फायदा घेऊन काही लोकांचा कोरेगाव-भीमा येथे दंगल घडवण्याचा डाव होता. आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत बसून हा डाव उधळून लावला. विजयी स्तंभाला अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. सत्ता बदलल्याने त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी काही लोकांचा आज दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न होता. पण सत्ताधाऱ्यांसोबत बसून आम्ही हा डाव उधळून लावला आहे, असं आंबेडकर म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज पहिल्यांदा भीमा कोरेगाव येथे येऊन विजयस्तंभाला मानवंदना देऊन शौर्य  दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन शांततेचं आवाहन केलं आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. सर्वांनीच येथे येऊन शूर वीर सैनिकांना अभिवादन करावे . जातीय सलोखा ठेवण्याची आपली परंपरा आहे. ही परंपरा कायम राखण्याचं आवाहनही अजित पवार यांनी केलं. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळालाही पवार यांनी अभिवादन केलं.

दरवर्षी कोरेगाव-भीमा येथे लाखो  भीम सैनिक विजयी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात. यावर्षीही रात्रीपासूनच आंबेडकरी अनुयायांचे जत्थेच्या जत्थे कुटुंबकबिल्यासह कोरेगाव-भीमा येथे दाखल व्हायला सुरुवात झाली असून संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला आहे. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक कोरेगाव भीमा येथे दाखल झाले आहेत.  या परिसरात रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांच्या आणि दलित संघटनांच्या दुपारी सभा होत आहेत. रिपब्लिकन नेते, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचीही दुपारी सभा होणार आहे.

कोरेगाव-भीमा परिसर आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. एकूण ४०० वरिष्ठ अधिकारी आणि १० हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय कोरेगाव-भीमा परिसरावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनचा वॉचही ठेवण्यात आला आहे. तसेच अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून अनेक दलित कार्यकर्त्यांना जिल्हाबंदीही करण्यात आली आहे. त्याशिवाय कोरेगाव-भीमा परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टीही जाहीर करण्यात आली असून आठवडी बाजारही बंद ठेवण्यात आला आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पुणे-नगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. वियय स्तंभाकडे जाण्यासाठी बसेसची सुविधा देण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!