Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महानायक अमिताभ बच्चन यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

Spread the love

रुपेरी पडद्यावरील महानायक अमिताभ बच्चन यांना भारतीय सिनेजगतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला.  केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती. पण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला प्रकृती बरी नसल्यानं ते उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे हा पुरस्कार आज (२९ डिसेंबर) प्रदान करणार असल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं होतं. रविवारी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन अमिताभ बच्चन यांना सन्मानित करण्यात आलं.

‘हा पुरस्कार देऊन मला निवृत्तीचे संकेत तर दिले जात नाहीत ना, अशी शंका आली. पण मला अजून खूप काम करायचयं,’ अशा शब्दात अमिताभ यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाला त्यांची पत्नी खासदार जया बच्चन आणि मुलगा अभिषेकही उपस्थित होता. पुरस्काराच्या यापूर्वीच्या समारंभात अमिताभ बच्चन प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे रविवारी राष्ट्रीय फिल्म पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बच्चन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देण्याची सुरुवात १९६९ ला झाली. भारतीय सिनेमाचे जनक धुंडीराज गोविंद फाळके यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. दहा लाख रुपये रोख, शाल आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. २०१७ मध्ये या पुरस्काराने दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना अमिताभ म्हणाले, ‘५० वर्षांपूर्वी दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात झाली. तितकीच वर्षे मला या इंडस्ट्रीत झाली आहेत. या पुरस्काराचा मी विनम्रतेने स्वीकार करतो. पण या पुरस्काराची घोषणा झाली तेव्हा मनात शंका होती की हे संकेत आहेत का? तुम्ही खूप काम केलंत, आता थांबा असं सांगण्याचे? पण मी माझ्या चाहत्यांना सांगू इच्छितो की अजूनही थोडं काम बाकी जे पूर्ण करायचंय.’

आपलं सरकार

Click to listen highlighted text!