Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आपल्या भूमिकेवर ममता बॅनर्जी ठाम !! म्हणाल्या जीव गेला तरी बेहत्तर पण , माझ्या राज्यात एकही बंदी छावणी उभारू देणार नाही…

Spread the love

मरण आले तरी बेहत्तर पण माझ्या राज्यात एकही बंदी छावणी उभारू  देणार नाही असा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला दिला आहे. हा इशारा देत  असताना , केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व कायदा आणि एनआरसीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा एकदा कडाडून विरोध दर्शवला. केंद्र सरकारने कितीही प्रयत्न केला तरी पश्चिम बंगालमध्ये डिटेंशन सेंटर लागू होऊ देणार नाही. यासाठी मला मरण पत्करावे लागले तरी याची मला पर्वा नाही, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्वाच्या कायद्यावरून नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा आव्हान दिले आहे.

देशभरातून केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व कायदा व एनआरसीला विरोध होत आहे. देशातील नऊ राज्यांनी नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करणार नसल्याची भूमिका या आधीच घेतली आहे. यात महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश, राजस्थान या प्रमुख राज्यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सातत्याने मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. आज पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला आव्हान दिले आहे. उत्तर २४ जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

पश्चिम बंगालमधील राज्यातील कोणाही व्यक्तीने अफवेला बळी पडू नये . ते (केंद्र सरकार) म्हणतात की, या ठिकाणी डिटेंशन सेंटर लावणार आहेत. परंतु, या ठिकाणी सत्तेत कोण आहे?, मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतेय. पश्चिम बंगालमध्ये एकही डिटेंशन सेंटर आजिबात लागू होणार नाही. यासाठी मला माझा जीव द्यावा लागला तरी मी त्यासाठी तयार आहे. परंतु, मी भाजपला बंगालमध्ये डिटेंशन सेंटर लागू करू देणार नाही, मला माझा जीव द्यावा लागला तरी केंद्र सरकारला याची परवानगी देणार नाही, अशी ठाम भूमिका ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात याआधीच वक्तव्य केलेले आहेत. पश्चिम बंगालमध्ये या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येईल असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली होती. पश्चिम बंगालमध्ये या कायद्याची अंमलबाजावणी करणार नसल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी दिल्ली दौऱ्यावेळी दिली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!