Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

प्रा. डॉ. भाग्यश्री गोडबोले : विद्यार्थ्यांचा प्रसादचंद्रमा, भाग्यश्री : परडी आठवणींचे आज प्रकाशन

Spread the love


माणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्या प्राध्यापिका आणि ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र गोडबोले यांच्या सुविद्य पत्नी दिवंगत डॉ. भाग्यश्री गोडबोले यांचा आज २८  डिसेंबर जन्मदिवस. त्यांच्या आठवणींचा गंध अनेकांच्या आयुष्यांमध्ये दरवळतोय, दरवळत राहणार आहे. त्यांच्या आठवणी जागवणा-या ” भाग्यश्री : परडी आठवणींची ” या समरणिकेचे प्रकाशन माणिकचंद पहाडे लॉ कॉलेजच्या वतीने होत आहे. त्यानिमित्ताने त्यांचे विद्यार्थी चैतन्य धारूरकर यांचा विशेष लेख प्रसिद्ध करीत आहोत.


“ मॅडम, थोडं इन्फॉर्मल झालं तर चालेल ? ” हे मी गोडबोले मॅडमशी व्यक्तीशः बोललेलं पहिलं वाक्य. मॅडमकडे कि-चेन्सचा मोठा संग्रह होता. वर्गावर येताना पुस्तकांसोबत डस्टर, खडू आणि अधून-मधून वेगवेगळी आकर्षक स्वरूपाची कि-चेन्स त्यांच्याकडे असत. हे निमित्त साधून मी त्यांना त्या एवढी वेगवेगळी कि-चेन्स नेमकी आणतात कुठून, हे विचारलं. माझ्या त्या प्रश्नानं सुरू झालेला संवाद, गप्पा अखंडपणे मागील १९ वर्ष चालू होत्या.

शिकवणं, प्राध्यापकी या पेशावर मॅडमचं अतोनात प्रेम. एखादा वादक ज्या तन्मयतेनं, धर्मवृत्तीनं एखाद्या सभेपूर्वी आपल्या वाद्याच्या तारा जुळवतो, त्या सुरात लावतो हे बघणंही प्रसंगी जसा सोहळा तसं मॅडमना त्यांच्या शिकवण्याच्या नोट्स काढतानाचे दृश्य असेे. एखादा कुशल सर्जन कोणत्या जटील शस्त्रक्रियेपूर्वी हातमोजे चढवून ज्या उदात्त भावाने समोरच्या मानवी देहाकडे प्रगल्भ कटाक्ष टाकतो तशा मॅडम त्यांचा तास सुरू करण्यापूर्वी वर्गावर उपस्थित विद्यार्थ्यांकडे बघत. एखादा मूर्तिकार समोरच्या पाषाणाकडे बघून छिन्नीला हात घालताना जसा दिसत असेल तशा मॅडम मला हातात खडू घेऊन फळ्याकडे सरसावताना असंख्य वेळा दिसल्या. सहाजिकच यांच्या शिकवण्यात सर्व विद्यार्थी तादात्म्य पावायचे. ‘टॉर्ट लॉ’ हा विषय फर्स्ट इयरवर मॅडमने आम्हाला शिकवला. त्यांच्या अध्यापनात एक प्रकारची शिस्त, नेमकेपणा आणि ठेहराव होता. कुठलीही घाई, दगदग किंवा विषयांतर अजिबात नसे. सारं कसं अगदी मुद्देसूद आणि मोजकं. बोलणं अर्थपूर्ण आणि सुबोध. कसलंही पाल्हाळ नाही. ‘टॉर्ट लॉ’ हा विषय त्यांनी इतका सुरस करून शिकवला कि आजही माझ्याकडे त्यांच्यावर तासात वर्गावर काढलेल्या रनिंग नोट्स डायरी मी जतन करून ठेवलीये. ‘ट्रेसपास वॉईड ॲब इनिशिओ’ या संकल्पनेवर आधारित ‘सिक्स कार्पेंटर्स केस’ हे ‘टॉर्ट लॉ’मधील एक गाजलेलं प्रकरण. सहा सुतार एका हॉटेलात जाऊन आपल्या बीयर आणि ब्रेड ची ऑर्डर देतात आणि नंतर झाल्या बिलाचे पैसे देण्यास हात वर करतात असं ते प्रकरण.

गोडबोले मॅडमनी ते अशा हातोटीनं शिकवलं की मी इंग्रजीतील Jack and Jill went up the hill या बालगीता सारखी एक गमतीशीर पद्य रचनाच – Six carpenters went in an Inn, But their pockets were empty and thin या शब्दात करून टाकली. मॅडमला ती आवडलीही.

सांगायचा मुद्दा, मॅडमचं अध्यापन होतंच इतकं सोपं आणि सुटसुटीत की आपण बोजड ‘कायदा’ शिकतोय असं कधीही वाटलं नाही. आपण कुठल्या गंमत गोष्टी ऐकतोय आणि त्यातही काही न्यायिक तत्त्व दडलंय याची जाणीव मॅडम नकळत करून द्यायच्या. ‘ बीजगणित आणि कायदा शिकणं हे सर्वात जटील आणि दुर्बोध असतं ’ अशा आशयाची एक चायनीज म्हण आहे. हि म्हण रूढ करणाऱ्या चायनीझ गृहस्थाने कधीही मॅडमचा कायद्याचा तास अटेंड केला नाही हे त्याचं दुर्भाग्य.

माझ्या घरी मी फर्स्ट जनरेशन लॉयर. कायदा, त्याची वैशिष्ट्यपूर्ण परिभाषा याचा काडीचाही संबंध कधी आला नव्हता. सारी कलमं, त्यांची शब्दरचना याने प्रसंगी गाळण उडायची. अभ्यासक्रमात ‘ हिंदू वारसा हक्क कायदा’ हा असाच एक क्लिष्ट विषय. त्यात कलम ८ म्हणजे जणू उंच इमारतीचा चक्राकार जिनाच. वाचता-वाचता भोवळ यावी अशी रचना आणि त्यात नमूद प्रक्रिया. मृत्युपत्र न करता मरण पावलेल्या हिंदू व्यक्तीच्या संपत्तीचं वितरण त्याच्या मृत्यूपश्चात कसं व्हावं याची प्रक्रिया त्यात समजावून सांगितली आहे. पहिल्यांदा हे प्रकरण वर्गावर शिकलो तेव्हा अक्षरशः इयत्ता नववीच्या वर्गात ‘ट्रिग्नोमेट्री’ नावाचा गणितीय राक्षस शिकताना जी दैना झाली होती त्याच्या भयकारक आठवणी जाग्या झाल्या. हे आपल्याला झेपणारं नाहीये, आपण पक्कं या विषयात बुडणार अशी ठाम खात्री झाली. वर्ग संपला तसं वर्गाबाहेर मॅडम भेटल्या. माझा चेहरा पाहूनच त्यांना घडला प्रकार लक्षात आला होता. “ चैतन्य, काय झालंय ? बरा आहेस ना ?” त्यांनी आत्मीयतेने विचारलं. मी मनातली चलबिचल सांगितली. पाठ थोपटत त्या आश्वासकपणे म्हणाल्या, “ नो प्रॉब्लेम. मी अजून एकदा शिकवते. काळजी करू नकोस ”. त्यांनी तो भाग वर्गावर परत शिकवला. मी उत्तम गुणांनी विषयात उत्तीर्ण झालो. त्या संदर्भग्रंथासोबतच विद्यार्थ्याचा चेहरा वाचत. हे आताशा दुर्मिळ आहे.

कालांतराने वकिलीत पडलो. दीड वर्ष आदरणीय संतोष बोरा सरांकडे ज्युनियर म्हणून कामास होतो. सोबतीला ॲडव्होकेट राजेंद्र गोडबोले सरही काही छोटी-मोठी कामं देत होते. ती मी करीत होतो. काही काळ मग गोडबोले सरांच्या हाताखाली सेवाविषयक कायदा आणि त्यातील प्रकरणंही ज्युनिअर म्हणून हाताळली. यादरम्यान लाभलेला मॅडमचा स्नेह आणि मायेचा ओलावा ही जन्माची शिदोरी आहे. “ चैतन्य, मी चहा टाकतेय. तुझाही टाकते” किंवा “ जेवतोस का थोडं ?” म्हणून आग्रहाने नाश्ता आणि जेवण अशी बडदास्त मॅडमनी असंख्य वेळा ठेवली. हे सारं न पुसलं जाणारं चित्रंय.

त्यांना कॅन्सर असल्याचं निदान झालं त्याच्या आठवडाभरानंतर मी आणि माझी बायको – विनया – आम्ही मॅडमला घरी जाऊन भेटलो. त्या पडून होत्या. त्यांचा हात हातात घेऊन मिनिटभर नुसताच बसलो. जणू काही घडलंच नाहीये अशा अविर्भावात. कायदा, वकिली या विषयावर गप्पा झाल्या. त्यादिवशीही त्यांच्या ओठी त्यांचं नेहमीचं ठेवणीतलं टवटवीत हसू होतंच. पुढे त्यांचे उपचार सुरू झाले. किमोथेरपी चालू होत्या. सरांकडून, सरांच्या ज्युनिअर्सकडून ताजा हालहवाल कळत असे. त्या रिकवर होतायेत हे कळत होतं.

अवघ्या सहा महिन्यांपूर्वी औरंगाबाद आकाशवाणी केंद्रावर ‘ओळख भारतीय संविधानाची’ या विषयावर विधी क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखतीची मालिका प्रसारित झाली. त्या मालिकेत माझीही मुलाखत झाली. रेडीओवर मुलाखत प्रसारित झाली त्याच्या दुसर्‍या मिनिटाला मॅडमचा फोन आला. अगदी भरभरून दाद दिली. मी जणू शिकागो धर्मपरिषदेत व्याख्यान देऊन आलेला नरेंद्र दत्त – विवेकानंद होतो किंवा संसदेच्या सदनात माझं कुठल्या वादग्रस्त विषयावर जाजव्ल्य भाषणच झालं होतं जणू अशा आणि इतक्या त्या उत्स्फूर्त आवेशात त्या खुश होत्या. “तुमच्या फोनमुळे माझ्या अंगावर शहारा आलाय आत्ता, याक्षणी”, मी म्हणालो. “ तुम्ही कशा अहात मॅडम? ” मी विचारलं. “मी एकदम मजेत !” त्या उत्तरल्या. यादरम्यान कॅन्सरसारख्या क्रूर विकाराशी त्यांचा पीडादायी लढा चालू होता. पण याचा लवलेशही त्यांच्या बोलण्यात नव्हता. “मी एकदम मजेत !” हे म्हणतानाचं बळ त्यांना कुठल्या स्तोत्र अथवा धर्मग्रंथात मिळालं नव्हतं. ती त्यांची जीवनपध्दती होती.

कॉलेजजीवनात प्रत्येक विद्यार्थ्याच्या काही कुरबुरी होतात. त्या कधी वर्ग मित्रांशी तर कधी ज्येष्ठांशी संभवतात. कधी कुठल्या विद्यार्थ्यांने मॅडम कडे त्यांच्या कुठल्या सहकारी प्राध्यापकाची तक्रार केली, तर मॅडम त्यावर फक्त हलकंसं स्मित करायच्या आणि अन्य कुठलीही प्रतिक्रिया कटाक्षानं टाळायच्या. त्या फक्त हसून द्यायच्या. त्यांचं ते निकोप हसू कधीही शेवटपर्यंत लय पावलं नाही. कॅन्सरच्या विस्तवाची पायवाट त्या तुडवत होत्या, किमोथेरपीच्या नरकयातना भोगत होत्या, शरीराची पार चाळणी होत होती. पण त्यांचा आत्मविश्वास, आत्मबळ आणि त्यांचं ते स्मित अभेद्य होतं. त्या पुन्हा टवटवीत आणि ठणठणीत होऊन वर्गावर येतील याबद्दल प्रत्येकजण खात्री बाळगून होता. विद्यार्थ्याला त्याच्या समस्येबाबत सोल्यूशन सांगायच्या. हे करताना चुकूनही कधी मॅडमच्या तोंडून त्यांच्या सहकारी अथवा ज्येष्ठाबद्दल त्याच्या, तिच्यापश्चात अपशब्द अनुद्गार बाहेर पडल्याचं मी अनुभवलं नाही.

त्यांच्या जाण्याच्या अवघ्या आठ दिवस आधी सरांचा फोन आला. मॅडम आठवण काढतायेत असं सर म्हणाले. आणि मग थेट एका पहाटे मोबाईलवर तो काळीज कापणारा मेसेज धडकला. जे घडलंय, घडून गेलंय त्यावर आजही विश्वास बसत नाही. असं वाटतं आता दुसर्‍या क्षणी मॅडमचा फोन येईल. “छान लिहिलंयंस की”, म्हणून दाद देतील. “ये कॉफी प्यायला ” म्हणून बोलावतील. मॅडमचा फोन नंबर माझ्या फोनमधून म्हणूनच मी डिलीट केलेला नाही. करणारही नाही. संकटांशी सामना करणार्‍या प्रत्येकासाठी त्यांच्या स्मृती, त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती हा सतत तेवणारा नंदादीप आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनमार्गावर आशिर्वादाचं गुलाबपाणी शिंपीत जाणारी त्यांची आश्वासक निरांजनी नजर हि आजही आकाशातून आमच्याकडे पाहतेय, त्यांचं निर्व्याज, निर्मळ, प्रसन्न स्मित आजन्म आमच्या जीवनवाटा प्रकाशित करणार आहे याबद्दल मी ठाम आहे.

‘भारतीय संविधानातील कलम १४२ व सर्वोच्च न्यायालयाचे व्यापक विशेषाधिकार’ या विषयावर मॅडमनी त्यांचं पीएचडीचं संशोधन पूर्ण केलं. त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. कलम १४२ अन्वये सर्वोच्च न्यायालयाला एखाद्या प्रकरणात संपूर्ण व प्रभावी न्याय करण्याच्या अनुषंगाने विशेष निर्देश पारित करण्याचे अभूतपूर्व अधिकार प्रदान करतं. न्यायपालिकेतील केवळ सर्वोच्च न्यायालयालाच संपूर्ण देशात असे अपवादात्मक अधिकार उपलब्ध आहेत. जे घडून गेलंय त्याबाबतीत ईश्वरदरबारी कुठल्या न्यायालयानं मॅडमसाठी कलम १४२ सारख्या विशेषाधिकाराची योजना का नाही ?, असल्यास नियतीनं त्याचा उपयोग कधी का केला नाही ? यासाठी त्या परात्पर शक्तीविषयी कायमच माझ्या मनात अढी राहणार आहे.

– ॲड. चैतन्य धारूरकर

आपलं सरकार

Click to listen highlighted text!