Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Nagpur : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखांची कर्जमाफी

Spread the love

राज्यातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली. ही कर्जमाफी सरसकट असणार असून कोणत्याही अटी शर्थी लागू नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारुढ झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतिक्षा होती. आज विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ‘महात्मा फुले कर्जमाफी’ योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहे. शेतकऱ्यांची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची कर्जे माफ होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

मार्च महिन्यांपासून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार आहे. दोन महिने प्रशासकीय कामांसाठी लागणार असल्यामुळे मार्च महिन्यांपासून ही कर्जमाफी योजना सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार दिलासा देणार असून त्यांच्यासाठीच्या योजनेची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना बँकेच्या, सरकारी कार्यालयात रांगेत उभे राहावे लागणार नसल्याचे सांगत अर्थमंत्री जयंत पाटील यांनी भाजपला चिमटा काढला.

महात्मा फुले कर्जमाफी योजनेची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही वर्ष असणारा दुष्काळ, शेतमालाला हमी भाव नसणे, अवकाळी पाऊस यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला होता. शेतकरी कर्जमाफीची मागणी शेतकरी संघटनांनी यापूर्वी देखील केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही शेतकरी कर्जमाफी मुख्य मुद्दा होता.

निवडणुकीत  शिवसेनेने निवडणुकीत संपूर्ण कर्जमाफी करत सात बारा कोरा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने सातबारा कोरा केला पाहिजे होता. मात्र, दोन लाख रुपयांची कर्ज माफीची घोषणा ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. या फसवणुकीच्या विरोधात विरोधकांनी सभात्याग केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!