Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या विरोधात राज्यात सर्वत्र आंदोलन

Spread the love

मोदी सरकारने केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा  आणि एनआरसीला विरोध करण्यासाठी संविधान बचाव कमेटी, जमेतूल उलेमासह विविध सामाजिक संघटनांनी गुरूवारी मालेगाव बंदची हाक दिली आहे. या बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मालेगावकरांनी कडकडीत पाळून केंद्र शासनाचा निषेध केला आहे. यावेळी शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यात हजारो मुस्लिम बांधवांसोबत इतर धर्माचे नागरिकही सहभागी झाले होते.

दरम्यान, देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांची धरपकड करण्यात आली आहे. दिल्लीत महामार्ग बंद केल्याने ८ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

मनमाड 

मनमाडला मुस्लिम समाज व विविध राजकीय पक्षांनी मूक मोर्चा काढून नागरिकत्व सुधारणा विधयेक व एनआरसीला कडाडून विरोध केला. केंद्र शासनाने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला देशभरातून विरोध होत आहे. गुरूवारी त्याचे पडसाद मनमाड शहरात देखील उमटले असून मुस्लिम समाजतर्फे मूक मोर्चा काढून कॅब व एनआरसी रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या मोर्चात शिवसेना, आरपीआय, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वकील संघ, बहुजन वंचित आघाडीसह इतर पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कॅब व एनआरसी वेगवेगळ्या जाती धर्मांच्या नागरिकांमध्ये तेढ निर्माण करणारे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

मुंबई 

राजधानी मुंबईतही विविध सामाजिक संघटनांनी मोर्चा आणि निदर्शनांचं आयोजन केलं होतं. ऑगस्ट क्रांती मैदानापासून शांततेत हा मोर्चा काढण्यात आला. यात पत्रकार, लेखक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

औरंगाबाद 

औरंगाबादमध्ये या कायद्याच्या विरोधात आणि समर्थनासाठी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढल्याने वेगळीच स्थिती निर्माण झाली. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात गोंधळ उडाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि पुरोगामी विचारांच्या विद्यार्थी संघटना एकमेकांसमोर आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. तणाव असल्याने पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आला होता.

नागपूर 

उपराजधानी नागपुरमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असल्याने विविध संघटनांनी मोर्चा काढला होता. विविध मुस्लिम संघटनांनी काढलेल्या या मोर्चाला सामाजिक संघटांनीही पाठिंबा दिला होता. हा मोर्चा विधान भवनावर जाण्याआधीच पोलिसांनी अडवला. त्यानंतर मोर्चाच्या वतीने सरकारला निवेदन देण्यात आलं. हा कायदा घटनेच्या मुळ तत्वा विरोधात असून तो राज्यात लागू करू नये अशी मागणी करण्यात आली.

अहमदनगर 

अहमदनगर शहरात विविध डावे पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांच्यावतीने या कायद्याच्या विरोधात विरोध प्रदर्शन करण्यात आले. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, आरएसपी, फॉरवर्ड ब्लॉक, जीपीआईएमएल आदी पक्षाचे कार्यकर्ते तिरंगा झेंडा हाती घेत हे विरोध प्रदर्शन आंदोलन करण्यात आले. शहरातील वाडीया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर हे आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारच्या या कायद्यामुळे संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वाला तिलांजली मिळणार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

चिपळूण 

केंद्र सरकारने लागू केलेल्या सिटीझन अमेडमेंट बिलाच्या निषेधार्थ चिपळूण मधील मुस्लिम समाज आज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरत संविधान बचाव रॅली काढली. या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सामील झाले होते. चिपळूण मधील नगर परिषद पासून शहरातील चिंचनाक पतीसरात ही निषेध रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणसह अनेक ठिकाणी अशा प्रकारे संविधान बचाव रॅलीच आयोजन करण्यात आले आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!