Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

समृद्ध अभिनेते डॉ . श्रीराम लागू यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांची आदरांजली

Spread the love

मराठी रंगभूमीसह मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजविणारे समृद्ध अभिनेते श्रीराम लागू यांच्या निधनावर राष्ट्रवादीचे  अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

मराठी रंगभूमीने लाडका नटसम्राट गमावला आहे. ‘झाले बहु, होतील बहु; पण या सम हाच’, या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. श्रीराम लागू यांना श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. लागू यांनी साकार केलेला ‘नटसम्राट’ अविस्मरणीय ठरला. डॉ. लागू यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटांत काम केले. पण ‘पिंजरा’ मधील ‘मास्तर’ आणि ‘सिंहासन’ मधील ‘मंत्री’ त्यांनी जबरदस्त पद्धतीने उभा केला. डॉ. लागू हे उत्तम वाचक, लेखक व विचारवंत होते. सामाजिक, राजकीय विषयांवर ते आपली मते ठामपणे मांडत राहिले. मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात त्यांचे योगदान मोठे होते. डॉ. लागू यांना महाराष्ट्राची जनता सदैव स्मरणात ठेवील, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार 

वैचारिक भान असलेले प्रयोगशील रंगकर्मी म्हणून डॉ. लागूंचा मोठा प्रभाव कलाक्षेत्रावर राहीला. जुन्याजाणत्यांपासून ते होतकरू कलावंतापर्यंत सर्वांना त्यांचा आधार वाटायचा. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्या.

डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने आपण एका अत्यंत श्रेष्ठ अभिनेत्याला आणि पुरोगामी विचारांशी बांधिलकी असणाऱ्या व्यक्तीला मुकलो आहोत. डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा भावना राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या. तर राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुभाष देसाई यांनी ‘मराठी रंगभूमीला आणि अभिनय क्षेत्राला उत्तुंग उंचीवर नेणारा कलाकार आज आपल्यातून निघून गेला आहे. या दिग्गज कलाकाराला आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो, अशा भावना व्यक्त केल्या. डॉ. श्रीराम लागू यांनी पुरोगामी चळवळीबद्दलची बांधिलकी आयुष्यभर जपली. रंगभूमी, चित्रपट या क्षेत्रांत त्यांचे अतुलनीय योगदान आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून डॉ. लागू यांना श्रद्धांजली वाहिली.

देवेंद्र फडणवीस 

गेली अनेक दशके सिनेमा, नाट्य क्षेत्राच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी रसिकजनांवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे आपल्यातून निघून जाणे अतिशय दुःखद आहे. डॉ. लागू हे अभिनय जगतातील ‘सिंहासन’ होते. या ‘कलेच्या चंद्रा’ने ‘सामना’, ‘पिंजरा’ असे अनेक चित्रपट गाजवले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त अंधश्रद्धा निर्मुलनासह अनेक सामाजिक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले. अण्णा हजारे यांच्या लढ्यातही त्यांचा वाटा होता. मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टी सुद्धा त्यांनी गाजवली. त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या, आप्तस्वकियांच्या, कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे, अशा भावना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 

ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. पिंजरा, सामना यांसारखे चित्रपट आणि नटसम्राट, हिमालयाची सावली यांसारख्या अजरामर नाटकांमधून त्यांनी मराठी चित्रपट-नाट्यसृष्टी जिवंत केली, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ. लागूंना श्रद्धांजली वाहिली.

सिने -नाट्य कलावंत दिग्दर्शकांची आदरांजली 

डॉक्टर हे विचारवंत नट होते. त्यांनी विचार आणि नाटक कधी एकमेकांपासून वेगळे मानले नाही. ज्या काळात रंगभूमीवर शैलीबद्ध अभिनयाचा पगडा होता त्या काळात डॉक्टरांनी आपल्या वास्तववादी अभिनयाने रंगभूमीला एक वेगळी दिशा दिली. शिस्तबद्ध आणि पुरोगामी विचार असलेले एक नाट्यपर्व आणि खऱ्या अर्थाने नटसम्राट व्यक्तिमत्वच आज आपल्यात नाही याचे दुःख आहे, अशा शब्दांत दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी श्रद्धांजली वाहिली. तर सर्वार्थाने नाटकांवर प्रेम करणारा माणूस, मोठा अभिनेता, रंगकर्मी आणि आमचे आदर्श श्रीराम लागू गेले याचे अतीव दुःख झाले, अशा भावना अभिनेते सुबोध भावे यांनी व्यक्त केल्या. डॉ. लागू हे हॅम्लेट पाहण्यासाठी आले होते. त्यांनी तीन तास ते नाटक पाहिले. त्यानंतर मला आशीर्वाद दिले. त्यामुळे मी भरुन पावलो होतो, अशी आठवण सांगत अभिनेते सुमीत राघवन यांनी श्रद्धांजली वाहिली.

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!