Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

एनआरसी आणि कॅब च्या विरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा मशाल मार्च , देशभरासह महाराष्ट्रात आंदोलनाची तीव्रता वाढू लागली

Spread the love

एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा  कायद्याच्या विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात  समविचारी संघटनांनी एकत्र येत मशाल मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले आहेत. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे यांनी मोर्चात सहभागी होत विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे.

देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध देशभरात आंदोलनाचा वणवा भडकला आहे. दिल्लीत या कायद्याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक रूप धारण केले आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामियात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी बळाचा वापर करत हल्ला केला. त्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. दिल्लीतील सीलमपूर-जाफराबाद भागात मंगळवारी प्रचंड हिंसाचार उसळला. अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली. त्याचवेळी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. पश्चिम बंगालमध्येही आंदोलन तीव्र झाले आहे. कोलकात्यानंतर आज हावड्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढून नागरिकत्व कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

देशात ठिकठिकाणी या कायद्याविरुद्ध आंदोलन सुरू असून या आंदोलनात युवा वर्ग आणि विद्यार्थी अग्रभागी दिसत आहेत. या आंदोलनात आज पुण्यातील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात उतरले. ‘नो कॅब, नो एनआरसी’ असा हॅशटॅग घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काढण्यात आलेल्या मशाल मोर्चात शेकडो विद्यार्थी एकवटले. विद्यापीठाच्या आवारातील अनिकेत कँटीनवळ मशाल मोर्चात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. मुंबई, लखनऊ या शहरांतही जामियातील घटना तसेच नागरिकत्व कायद्याविरुद्ध निदर्शने तसेच मोर्चे निघाले. तर औरंगाबाद शहरातही याच विषयावरून आंदोलन करण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!