Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

फीस देण्याच्या बहाण्याने “त्यांनी” वकीलाशी संपर्क साधला, गुगल पे ची लिंक क्लिक करायला सांगितली आणि वकीलाचेच ४० हजार गुल झाले !!

Spread the love

व्यवसाय वृद्धीसाठी सोशल साईट्सवर केलेली प्रसिद्धी एका वकिलास महागात पडली आहे. सायबर चोरट्यांनी या माहितीच्या आधारे वकिलास संपर्क करून फी देण्याचा बहाणा करीत ४० हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अ‍ॅड.जगदीश सुरेश शिंदे (रा. मुंगसरे, ता. जि. नाशिक) असे फसवणूक झालेल्या वकिलाचे नाव आहे.

अ‍ॅड.जगदीश सुरेश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि , फसवणुकीची हि घटना शनिवारी (दि. ७) रोजी घडली. यावेळी अॅड. शिंदे न्यायालयीन कामकाजात व्यस्त असतांना भामट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. पक्षकार असल्याचे भासवून तुमचे पैसे बँकेत भरणा करतो, असे सांगत सायबर चोरट्यांने शिंदे यांच्या बँक खात्याची माहिती मिळविली. यानंतर अल्पावधीतच अ‍ॅड. शिंदे यांच्या अ‍ॅक्सीस बँकेतील खात्यातून ४० हजारांची रक्कम वजा झाल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर वाजला आणि ते चकित झाले.

या प्रकाराबाबत सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देवराज बोरसे यांनी सांगितले, की आरोपीने अॅड. शिंदे यांचा मोबाइल क्रमांक कुठल्यातरी सोशल साईटवरून मिळविला होता. शिंदे हे वकील असून, ते सध्या वकिली करतात, याची चोरट्याला माहिती होती. त्यामुळे त्याने आपण परराज्यातून बोलत असून, आपली एक केस नाशिक कोर्टात लढवयाची असल्याचे आरोपीने सांगितले. केसची प्राथमिक माहिती घेतल्यानंतर खटला लढण्यासाठी फी देण्याचे ठरविण्यात आले.

आतापर्यंत बँकेतून अधिकारी बोलत असल्याचा बहाणा करीत यापूर्वी अशा प्रकारच्या फसवणूक झाल्या आहेत. मात्र, यावेळी थेट व्यवसायाशी निगडीत ट्रॅप झाला आहे. सायबर चोरट्यांची नवीन मोड्स आपरेंडी असल्याचे पीआय बोरसे यांनी स्पष्ट केले. अनोळखी व्यक्तीसोबत व्यवहार करताना आलेल्या मॅसेजेसवर क्लिक करणे, ओटीपी सांगणे अशा बाबींची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रकरणाबाबत बोलताना पीआय देवराज बोरसे म्हणाले  की,  चोरट्याने शिताफीने सर्व ड्रामा उभा करीत अॅड. शिंदे यांचा विश्वास जिंकला. यानंतर त्याने अॅड. शिंदे यांच्या बँकेचे डिटेल्स घेतले. याचा गैरफायदा चोरट्याने घेतला. थोड्याच वेळात शिंदे यांना गुगल पे अॅपच्या लिंकचा एक मॅसेज मिळला. आरोपीने त्यास क्लिक करण्यास सांगितले. अॅड. शिंदे यांनी त्यावर क्लिक करताच आरोपीने त्यांच्या बँक खात्यातील ४० हजार गेल्याचा मॅसेज त्यांच्या मोबाईलवर येऊन धडकला. तेंव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे चोरटे झारखंडमधील असून, त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोरसे यांनी स्पष्ट केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!