Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Nagpur : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजप -सेना आमदारांची धक्काबुक्की , कामकाज तहकूब

Spread the love

नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप -सेनेच्या आमदारांमध्ये चांगलीच धक्काबुक्की झाली.  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत चर्चा सुरू असताना हा प्रकार घडला. भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यात ही धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आ. गायकवाड यांनी धक्काबुक्कीचा इन्कार केला आहे. विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने आक्रमक होत आपल्या मागण्या मांडण्याचा आक्रमक प्रयत्न केला तेंव्हा हा प्रकार घडला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी यावेळी केली. काही वेळाने गोंधळ वाढत गेला. त्यानंतर विरोधी पक्षाचे आमदार विधानसभा अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत जमा होत त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यावेळी भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या हातात बॅनर होता. या बॅनरवर अध्यक्षांनी आक्षेप घेतला. सभागृहात बॅनर फडकावल्यास कारवाई करेन असे अध्यक्षांनी बजावले. मात्र पवार हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. हे पाहून आपण तिथे जात पवार यांच्या हातातील ते बॅनर काढून घेण्याचा प्रयत्न केला, असे गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान सभागृहात दोन आमदारांमध्ये संघर्ष उभा राहिल्यानंतर सत्तारूढ पक्षाकडून जयंत पाटील आणि भास्कर जाधव यांनी आमदारांना समजावण्याचा प्रयत्न केला. भाजपकडूनही आशिष शेलार आणि गिरीश महाजन यांनी भाजप आमदारांना थांबवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर अध्यक्ष नाना पटोले यांनी गोंधळ करणाऱ्या आमदारांची नावे लिहून घेतली आहेत. सभागृहात धक्काबुक्की झाल्याने, तसेच गोंधळ अधिकच वाढत गेल्याने अध्यक्ष पटोले यांनी सभागृहाचे कामकाज अर्ध्यातासासाठी तहकूब केले.

भाजपच्या काही आमदारांनी आमदारांनी सावरकरांसंबंधित बॅनर्स सभागृहात आणले होते. सभागृहात अशा प्रकारे बॅनरबाजी करण्यास परवानगी नसते. असं असताना भाजपच्या आमदारांनी सभागृहात बॅनर झळकावल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. अशा आमदारांचं विधानसभा अध्यक्ष निलंबनही करू शकतात.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!