Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

एका विवेकनिष्ठ , विज्ञानवादी , सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अभिनेत्याची हुरहूर लावणारी एक्सझिट …..

Spread the love

रंगभूमीवरील अभिजात कलावंत ज्येष्ठ अभिनेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी , हिंदी आणि मराठी चित्रसृष्टीही पोरकी झाली आहे. त्यांचा जीवन प्रवास ९२ वर्षांचा राहिला. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी दिलेलं योगदान शब्दातीत आहे. त्यांच्या नाट्यभिनयाने रसिकांना अक्षरशः मोहिनी घातली होती. रंगभूमीवर त्यांनी साकारलेले प्रत्येक नाटक एक इतिहास बनवून गेले. त्यांची सर्वच नाटके प्रचंड गाजली. श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ या दिवशी झाला होता. त्यांचे  शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले  होते.

‘देवाला रिटायर करा’ या त्यांच्या लेखामुळे महाराष्ट्रात मोठी  खळबळ उडाली  होती. नाट्य- चित्रपटांबरोबरच अंधश्रद्धा निर्मुलन क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान होतं. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत त्यांनी अनेक कार्यक्रम केले आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात त्यांनी पुरोगामी विचारांची पेरणी केली. ते महाराष्ट्रातील अंधविश्वास निर्मूलन समितीशी जोडलेले होते. देव हा सुद्धा एक अंधविश्वासासाच प्रकार आहे, असं त्यांचे म्हणणं होते.  प्रखर विज्ञानवाद आणि समाजवादावर त्यांची नितांत श्रद्धा होती. सुशिक्षित लोकसुद्धा नवस वगैरे करतात यावर ते आपले स्पष्ट मत मांडायचे. आपल्या जीवनाचे आपण शिल्पकार असतो आणि आपले ध्येय साध्य करायचे आपल्याच हातात असते, हा  विचार डॉ. लागू तरूण पिढीला सांगत असत.

वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाट्यभिनयाची आवड लागली आणि ते रंगभूमीकडे कमालीचे आकर्षित झाले.  आपल्या अभिनयाच्या आणि रंगभूमीवरच्या प्रेमापोटीच त्यांनी डॉक्टरकी सोडून त्यांनी नंतर भालबा केळकर यांच्यासोबत  पुरोगामी नाट्य संस्थेची स्थापना केली. १९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले आणि नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले होते. १९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. पण वैद्यकीय व्यवसायात त्यांचे मन रमले नाही. दरम्यान भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील त्यांनी काम सुरु केले होते. शेवटी १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून काम करण्यास सुरूवात केली.

‘हिमालयाची सावली’, सूर्य पाहिलेला माणूस’, ‘गिधाडे’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘काचेचा चंद्र’, ‘आंधळ्यांची शाळा’ याबरोबरच कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकात त्यांनी अप्पासाहेब बेलवलकरांची प्रमुख भूमिका नाट्यरसिकांच्या कायम समरणात राहिली. आपल्या हयातीत त्यांनी सुमारे ४८ नाटकात तर १२५ हुन अधिक हिंदी मराठी नाटकात त्यांनी विविध भूमिका साकारल्या.  ‘सिंहासन, पिंजरा, मुक्ता’ हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. तर अनकही, अरविंद देसाई की अजीब दास्तान, इक दिन अचानक, कामचोर, घरोंदा, फूल खिले हैं गुलशन गुलशन, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, सरगम, सौतन हे त्यांचे हिंदी चित्रपट विशेष होते. त्यांना फिल्मफेअर (१९७८), संगीत नाटक अकादमी फेलोशिप (२०१०) ने सन्मानित करण्यात आले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!