Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Pakistan : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना मृत्यू दंडाची शिक्षा

Spread the love

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या खटल्यात विशेष न्यायालयाने  आज मृत्युदंडाची शिक्षा सुनावली असल्याचे वृत्त आहे. मुशर्रफ सध्या आरोग्यविषयक उपचारासाठी दुबईत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुशर्रफ यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आरोग्याबाबत माहिती दिली होती. मी कोणत्या परिस्थितीत आहे हे चौकशी आयोगाने  येऊन पाहावे  असे  ते म्हणाले होते.

परवेझ मुशर्रफ यांनी ३ नोव्हेंबर २००७ रोजी पाकिस्तानात आणीबाणी लादली होती. या प्रकरणी पाकिस्तानमधील तत्कालीन मुस्लीम लीगच्या नवाज सरकारने त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. २०१३ पासून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. डिसेंबर २०१३ मध्ये त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल झाला होता. त्यानंतर ३१ मार्च २०१४ मध्ये मुशर्रफ यांना आरोपी घोषित करण्यात आलं आणि त्याचवर्षी सप्टेंबरमध्ये विशेष न्यायालयात साक्षी नोंदवल्या गेल्या.

मुशर्रफ यांच्याविरोधातील खटल्याचा निकाल १७ डिसेंबरला दिला जाईल, असे  तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने  याआधी सांगितले  होते . त्यानंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने  २८ नोव्हेंबरला मुशर्रफ आणि पाकिस्तान सरकारकडून दाखल याचिकांवरील सुनावणीवेळी विशेष न्यायालयाला निकाल सुनावण्यापासून रोखले होते.

दरम्यान गेल्या आठवड्यात विशेष न्यायालयाने  ७६ वर्षीय मुशर्रफ यांना या प्रकरणी जबाब नोंदवण्यास सांगितलं होते . त्यानंतर दुबईत वास्तव्यास असलेल्या मुशर्रफ यांनी व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण देताना म्हटले होते कि ,  ‘मी खूपच आजारी असून, देशात येऊन जबाब नोंदवणे  शक्य नाही.’ यासंबंधी पाकिस्तानी माध्यमांनीही वृत्त प्रसिद्ध केलं होतं. मुशर्रफ यांना दुर्मिळ आजार असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे  या वृत्तात म्हटले होते . मुशर्रफ यांनी देशद्रोहाचे आरोप फेटाळले होते. मी नेहमीच या देशाची सेवा केली आहे. देशाशी गद्दारी केल्याचा आरोप साफ चुकीचा आहे. दहा वर्षे मी देशाची सेवा केली. त्यामुळे  माझ्यावर देशद्रोहाचा कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!