Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Nagpur : हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विरोधी पक्षावर चौफेर टोलेबाजी

Spread the love

राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होत असून अधिवेशनाच्या पूर्वसंधेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक मुद्यांवर भाष्य करीत भाजपवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि , हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंधेला ‘चहापान’ प्रथा आहे, आता ‘बहिष्कार चहापान’ ही नवी प्रथा सुरू होते आहे. चहावाल्या पंतप्रधानांच्या पक्षातल्या नेत्यांनी तरी चहापानावर बहिष्कार घालायला नको होता. आपले पंतप्रधान एक चहावाले होते, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. येथील नेत्यांनी चहाला नाही म्हणायला नको होते, विशेष म्हणजे आज आंतरराष्ट्रीय चहा दिन असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी भाजपला चिमटा काढला.

या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी  उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच आज नागपुरात आगमन झाले आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. विधानसभा निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासन पाळणार असल्याचे सांगताना ठाकरे म्हणाले कि , आमचे सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त नाही  तर चिंतामुक्त करणार असून त्यांच्यासाठी लवकरच चांगला निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आमचे सरकार  पाचच काय , २५ वर्षेच काय ५० वर्षे आणि पिढ्यान पिढ्या कायम राहिल

पुढील केवळ पाचच नाही पंचवीसही नाही तर पन्नास वर्षे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात कायम राहिल, असे ठाम  प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. उद्यापासून सुरु होत असलेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री ठाकरे नागपूरात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ठाकरे म्हणाले, माझ्याकडे जनतेचे आशिर्वाद आहेत. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण हा संपूर्ण महाराष्ट्र एक आहे. महाराष्ट्राला देशाला अभिमान वाटेल असे सरकार, शासन आम्ही चालवू. जर आपण एकत्र आलो तर हे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे तर २५ वर्षेच काय ५० वर्षे आणि पिढ्यान पिढ्या कायम राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधानांनी हे का केले नाही ? 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि , लोकांना सतत चिंतेत ठेवा आणि कारभार आटपा अशी स्थिती भाजपची असल्याचे ते म्हणाले. देश एक राहील हे सावरकरांचे मत आहे. पण तुम्ही त्या मार्गावर चालत नाही. अल्पसंख्यांकाना बाजूला ठेवता. अल्पसंख्यांक सुरक्षित असतील तर गाठ आमच्याशी आहे, असे पंतप्रधानांनी राज्यकर्त्यांना ठणकावून सांगायला हवे होते. पण तसे झाले नसल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबाबतची भूमिका शिवसेनेने कालच स्पष्ट केली आहे. सावरकरांबाबतची आमची भूमिका कायमच आहे. त्यात बदल होणार नाही. पण सावरकरांवरून आम्हाला जाब विचारणाऱ्यांनी आधी सावरकरांच्या तत्वांविरोधातील नागरिकत्व विधेयक कायदा का आणला? याचं उत्तर द्यावं,’ असा सवाल करतानाच ‘केंद्र सरकारने नको त्या गोष्टी उकरून काढून देशातील मूळ प्रश्नांपासून जनतेचं लक्ष विचलीत करण्याचा डाव आखला आहे,’ अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.

हा तर सावरकरांच्या विचारांशी द्रोह 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, नागरिकत्व कायदा आणि विकासकामांना देण्यात आलेली स्थगिती आदी मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली. सावरकरांनी सिंधू नदीपासून ते कन्याकुमारीपर्यंत हा देश एकसंघ राहील अशी भूमिका मांडली होती. तुम्ही सावरकरांना मानता मग पाच वर्षे तुमच्या हातात सत्ता असताना तुम्ही देश एकसंघ करण्यासाठी काय केले? इतर देशातील पीडित अल्पसंख्याकांना तुम्ही भारतात बोलवून त्यांना तुम्ही असुरक्षितच करत आहात. हा सावरकरांच्या विचारांशी द्रोह नाही का? इतर देशातील पीडितांना भारतात आणण्यापेक्षा पीडित अल्पसंख्याकांचा छळ करणाऱ्या पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानला सक्त ताकीद देण्याची हिंमत का दाखवली नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

सावरकरांना भारतरत्न देण्याचा निर्णय गेल्या पाच वर्षात का नाही घेतला ?

एका झटक्यात नागरिकत्व कायदाचा निर्णय घेणारे सावरकरांना भारतरत्न देण्याचा निर्णय का घेत नाहीत? असा सवालही त्यांनी केला. नागरिकत्व कायदा संविधानाला धरून आहे का? असा सवाल करतानाच सध्या हे प्रकरण कोर्टात गेलं आहे. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर त्यावर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असंही ते म्हणाले. देशातील परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर काहीच करता येत नाही. तेव्हा देशात गोंधळ उडवा आणि लोकांमध्ये भीती निर्माण करा, असं भाजपचं धोरण राहीलं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!