Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : दामदुपटीचे आमिष दाखवून अनेकांना गंडा , शहरातील आठ जणांची ४० लाखांची फसवणूक , दोघांविरुध्द गुन्हा दाखल

Spread the love

औरंगाबाद : रिदास इंडिया प्रॉपर्टीज लिमीटेड कंपनीत पैसे गुंतविल्यास ४० दिवसात मुळ रकमेचा परतावा देऊन दरमहिन्याला दोन हजार ६५० ते तीन हजार १२५ रुपये नफ्यापोटी देण्यात येईल. असे आमिष दाखवून कंपनीच्या संचालकांनी आठ जणांना ४० लाखांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कंपनीचा संचालक मोहम्मद अयुब हुसेन व मोहम्मद अनिस आयमान यांच्याविरुध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रांतीचौकातील हिंद सुपर पेट्रोल पंपावर लेखापाल म्हणून नोकरी करत असलेले मोहम्मद रफी मोहम्मद ताहेर शेख (३७, रा. पटेल प्राईड फ्लॅट ४०१, सादातनगरच्या मागे) यांना रिदास इंडीया प्रॉपर्टीज लिमीटेड या कंपनीचे मुख्य कार्यालय बंगळुरु आणि ठाणे येथे असून, त्याची एक शाखा सन २०१६ पासून जुनाबाजारात सुरू आहे. तिचे संचालक मोहम्मद अयुब हुसेन व मोहम्मद अनिस आयमन असल्याचे सांगण्यात आले होते. तर सैफुद्दीन झियाऊद्दीन व अली हे मागील दहा वर्षांपासून मोहम्मद रफी यांचे मित्र आहेत. हे दोघेही याच कंपनीत कामाला आहेत. त्यांनी सन २०१७ मध्ये रफी यांना कंपनीबाबत माहिती सांगितली होती. या कंपनीत बरेचशे जण गुंतवणूक करत आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळाला आहे. असे सांगत सैफुद्दीन व अलीने रफींना कंपनीचे माहितीपत्रक दाखविले.

कमीत कमी ५० हजार रुपयांची गुंतवणुक केल्यास त्यामोबदल्यात प्रत्येक महिन्याला दोन हजार ६५० रुपयांपासून तीन हजार १२५ रुपये नफ्यापोटी परतावा मिळेल. तसेच मुळ रक्कम अर्ज केल्यानंतर ४० दिवसात परत मिळेल असे आमिष दाखविण्यात आले. कंपनीत गुंतवणूक केलेल्या रकमेतून कंपनी वेगवेगळे व्यापार करते. गोट फॉर्म, प्रॉपर्टी विकास, फुड पॅकेजींग, जमीन खरेदी-विक्री ईत्यादी व्यवसायांमध्ये पैसे गुंतवणूक करुन त्यातून मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. नफा गुंतवणुकदारांना त्यांचे गुंतवणुकीच्या रकमेप्रमाणे वाटप केला जातो असेही सांगण्यात आले. त्यावरुन २६ आॅक्टोबर २०१७ रोजी रफी यांनी कंपनीचे जुना बाजारातील कार्यालय गाठले. तेथे त्यांनी सैफुद्दीन व अली यांची भेट घेतली. त्यानंतर कंपनीचे संचालक अयुब हुसेन व त्यांचा मुलगा मोहम्मद अनिस आयमन यांना संपर्क क्रमांक दिला. त्यांनी कंपनी कोणतीही फसवणुक करणार नाही, असा विश्वास दर्शवला. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेऊन रफी यांनी २७ आॅक्टोबर २०१७ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत कंपनीच्या बँक खात्यात आरटीजीएसव्दारे एकुण १२ लाख ५० हजार रुपये दोन वर्षांकरिता गुंतविले. तसेच पत्नी शेख जबीन हिच्या नावे देखील चार लाखांची गुंतवणुक केली. त्यानंतर रफी यांना कंपनीने मुद्रांकावर करारनामा, सेक्युरीटी चेक व गुंतवणूक प्रमाणपत्र दिले. कंपनीच्या योजनेप्रमाणे डिसेंबर २०१८ पर्यंत नफ्याच्या स्वरुपात गुंतवणुकीप्रमाणे पैसे मिळाले. मात्र, त्यानंतर कंपनीने पैसे देणे बंद केले.

दरम्यान रफी यांनी अनेकवेळा जुना बाजारातील कार्यालयात चकरा मारल्या. तेव्हा कर्मचारी सैफुद्दीन व अली यांना पैसे परत करण्याबाबत विनंती केली. परंतू त्यांनी काही ना काही कारण सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे कंपनीचे संचालक अयुब हुसेन व अनिस आयमान यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी देखील पैसे देण्याचे टाळले. पुढे मार्च २०१९ मध्ये कंपनीच्या संचालकांनी शहरातील सेवन अ‍ॅपल या हॉटेलमध्ये गुंतवणुकदारांची बैठक घेऊन कंपनीत आणखी गुंतवणुक करण्याबाबत सांगितले. तसेच गुंतवणुकदारांचे पैसे लवकरच मिळतील असेही म्हणाले. त्यानंतर रफी यांना दोन टप्प्यांत ४५ हजार रुपये कंपनीने दिले. पण त्यानंतर कंपनीने शहरातील कार्यालयाला टाळे ठोकले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अजय सूर्यवंशी करत आहेत.


यांचीही झाली फसवणूक……..
कंपनीने ठरवुन दिलेल्या नियमाप्रमाणे गुंतवणुकीची मुळ रक्कम परत न देता रफी व त्यांच्या पत्नीचे १६ लाख ५० हजार रुपये, फातेमा सज्जाद हुसेन अडीच लाख, परवेज रहिम खान पठाण, सय्यद खमर सय्यद फैयाज, शेख अझरुद्दीन शेख शरफोद्दीन यांचे प्रत्येकी दोन लाख, शेख अझहरुद्दीन शेख अजीजोद्दीन सात लाख, शेख मोहसिनोद्दीन दिड लाख, अब्दुल आवज रऊफ शेख साडेसहा लाख अशी ४० लाखांची फसवणूक केली.


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!