महाराष्ट्राचे राजकारण : भाजपच्या नेतृत्वाचे आज गोपीनाथ गडाकडे लक्ष…देवेंद्र फडणवीस यांच्यावर डागली तोफ

Spread the love

विधानसभेच्या निकालानंतर अस्वस्थ असलेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आज गोपीनाथ गडावरून भविष्यातील आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याने भाजपचे लक्ष आज त्यांच्या सभेकडे लागले आहे. दरम्यान त्याआधीच पंकजा मुंडे यांनी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट नाराजी व्यक्त करीत  विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारांना तिकीटांचे वाटप करण्याचा आणि काही जणांना तिकिटे नाकारण्याचा निर्णय हा दिल्लीत नसून महाराष्ट्रातच घेण्यात आला होता, असा गौप्यस्फोट केला असल्याने सभेपूर्वीच त्यांनी तोफ डागली आहे.

दरम्यान काहीही झाले तरी स्वतः पंकजा मुंडे आणि त्यांच्यासमवेत असणारे नाराज भाजप नेते पक्ष सोडण्याचाही भूमिका घेण्याची शक्यता तशी कमीच आहे कारण जी दोन नावे पुढे आली आहेत त्यात त्या स्वतः आणि एकनाथ खडसे यांची नावे असली तरी पक्षाची खासदारकी या दोघांच्याही घरात असल्याने भाजप सोडण्याचे नैतिक धैर्य त्यांच्यात नसणार हे उघड आहे. मात्र या दोन्हीही नेत्यांकडून पक्षावर दबाव वाढविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विधानसभा निवडणुकीत भाजपने १०५ जागा जिंकल्या आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने अनेक दिग्गज नेत्यांसह अनेक आमदारांचे तिकीट कापले होते. यामध्ये एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रकांत बावनकुळे, प्रकाश मेहता या प्रमुख नेते आणि माजी मंत्र्यांचा समावेश होता. त्यामुळे भाजपमधील नाराजी उजेडात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची जयंती आहे. यानिमित्त गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर नाराज असलेल्या पंकजा मुंडे त्यांची खदखद व्यक्त करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे चर्चेत आहेत. त्यातच गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त गुरूवारी गोपीनाथगडावर पंकजा मुंडे त्यांची ताकद दाखवून देणार आहेत. ताकद दाखवून देतानाच पंकजा मुंडे त्यांच्या समर्थकांसमोर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आपलं सरकार