Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CAB वरून सुरु झालेले आंदोलन चिघळले , गोळीबारात तीन ठार दोन जखमी , राज्यातील परिस्थिती हाताबाहेर : मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल

Spread the love

मोदी सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून आसाममध्ये प्रचंड हिंसाचार आणि तणाव निर्माण झाला असून या विधेयकाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ३ जण ठार झाले असल्याचे वृत्त आहे. गुवाहाटी क्लबच्या बाहेर पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या जोरदार धुमश्चक्री नंतर आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करतानाच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडूनही आंदोलक पंगत नसल्याचे पाहून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच जण जखमी झाले होते. त्यापैकी तीन जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

दरम्यान आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले असून नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे आसामच्या संस्कृतीवर कुठलाही घाला घालण्यात येणार नाही उलट आसामच्या संस्कृती रक्षणासाठी सरकार कटिबद्ध असेल असे राज्यपालांनी म्हटले आहे. आसामची संस्कृती , भाषा आणि अधिकारावर कुठीलीही बाधा येणार नाही असे सरकार अभिवाचन देत आहे असेही राज्यपाल म्हणाले. विशेष म्हणजे जनसंवादाची सर्व माध्यमे बंद असताना हे आवाहन लोकांपर्यंत कसे पोहचेल ? हा सुद्धा प्रश्नच आहे.

लोकसभा आणि राज्यसभेत पास झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला सुरू असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर गुवाहाटीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर आजही आंदोलकांनी संचारबंदीला न जुमानता हिंसक आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. पोलिसांच्या या गोळीबारात ५ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या पाच पैकी तीन जणांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. गुवाहाटी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे अधीक्षक रामेन तालुकदार यांनी ही माहिती दिली. मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांना गोळी लागल्याने त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असणाऱ्या तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती शहरात पसरताच या परिसरात नागरिकांनी आंदोलन अधिक तीव्र झाले आहे.

दरम्यान केवळ आसाम नव्हे तर त्रिपुरातही लोक रस्त्यावर उतरले असून या विधेयकाला विरोध करीत आहेत. हे  नागरिकत्व विधेयक मंजूर झाल्याने १० ते १५ लाख लोक भारताचे  नागरिकत्व घेणार असून हे लोक आसाममध्येच वास्तव्य करणार असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे आंदोलक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले असून आसाममधील परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे  राज्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले . दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी आसाममध्ये आंदोलन सुरू झाल्याने गुवाहाटीचे पोलीस प्रमुख दीपक कुमार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून मुन्नाप्रसाद गुप्ता यांच्याकडे गुवाहाटीच्या प्रमुखपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत तरीही आंदोलन अधिकच चिघळत चालले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!