Nagpur : संतापजनक : सहा वर्षीय चिमुरडीचा दगडाने ठेचून हत्या

Spread the love

नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील लींगा येथे ६ वर्षीय चिमुरडीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त आहे. रविवारी दुपारी लिंगा गावाशेजारी असलेल्या शेतात मुलीचा मृतदेह आढळून आला. उत्तरीय तपासणीसाठी मुलीचा मृतदेह नागपूरच्या मेडिकल कॉलेजला पाठवण्यात आला असून कळमेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत.

उन्नाव , हैदराबाद येथील बलात्काराच्या आणि जिवंत जाळल्याच्या  घटना ताज्या  असताना लींगा गावात मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. गावकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असला तरी वैद्यकीय अहवाल आल्याशिवाय त्यावर काहीही भाष्य करता येणार नाही असे पोलिसांनी म्हटले आहे.  पोलिस त्या दिशेनेही  तपास करत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे.

या घटनेविषयी पोलिसांनी सांगितले कि , लिंगा या गावापासून जवळ पीडित मुलीच्या आजीचे घर आहे. मुलगी शुक्रवारी सकाळी आजीकडे जाण्यासाठी घरातून निघाली होती. ती आजीकडे गेली असेल असे समजून तिच्या आई-वडिलांनी तिचा शोध घेतला नाही. मात्र, शनिवारी सकाळी मुलगी आजीकडे गेली नसल्याचे समजताच आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. तक्रार मिळताच पोलिसांनी तिचा शोधा सुरू केला. आजूबाजूचा परिसर अक्षरश: पिंजून काढला. परंतु ती सापडली नाही. शनिवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास गावाजवळील एका झुडपात मुलीचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. मुलीवर अत्याचार झाला की नाही याबाबत आपण आत्ताच काही सांगता येत नासल्याचे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच याबाबत काही बोलता येईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान या घटनेमुळे गावात संतापाची लाट आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिस लक्ष ठेवून आहेत.

आपलं सरकार