Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिवसेना नगरसेवकाच्या खून प्रकरणात अरुण गवळीसह दहा आरोपींची जन्मठेप मुंबई हायकोर्टातही कायम

Spread the love

कुख्यात डॉन अरुण गवळीसह इतर आरोपींना  शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी सुनावण्यात आलेली जन्मठेप मुंबई हायकोर्टाने सोमवारी कायम ठेवली. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.

मुंबईतील असल्फा भागातील त्यांच्या राहत्या घरात नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची २ मार्च २००७ रोजी  हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी घरात घुसून त्यांना गोळ्या घातल्या होत्या. कुख्यात डॉन अरुण गवळी यानेच कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. अरुण गवळी याने कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येसाठी ३० लाख रुपयांची सुपारी दिली होती. अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.

दरम्यान, शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी यास हत्या, हत्येचा कट रचणे या आरोपांखाली मोक्कांतर्गत २००८ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईतील विशेष कोर्टाने अरुण गवळीला १४ लाख रुपयांचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याच्यासह इतर दहा आरोपींनासुद्धा या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. विशेष कोर्टाच्या निर्णयाला अरुण गवळीसह इतर आरोपींनी जन्मठेपेच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले होते. या याचिकेवर सोमवारी मुंबई हायकोर्टात झालेल्या सुनावणीत अरुण गवळीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.

या खटल्याची थोडक्यात माहिती अशी कि , शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांचा  सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीबरोबर प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. त्यानंतर सदाशिव सुर्वेनेच गवळीच्या हस्तकांमार्फत जामसंडेकर यांची सुपारी दिली होती. कुख्यात गुंड गवळीने प्रताप गोडसेकडे ही सुपारी सोपवली. या प्रकरणी नाव न येण्यासाठी नवे शूटर्स शोधण्यात आले. गोडसेने या कामगिरीसाठी श्रीकृष्ण गुरवमार्फत नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची निवड केली होती. या कामासाठी  दोघांनाही प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्याचे निश्चित करुन प्रत्येकी २० हजार रुपये अॅडव्हान्स सुद्धा देण्यात आले होते. विजयकुमार गिरीने अशोककुमार जयस्वाल सोबत जवळपास १५ दिवस जामसंडेवर पाळत ठेवली होती. आणि २ मार्च २००७ रोजी जामसंडेकर यांची राहत्या घरात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांनी निर्घृण हत्या करण्या आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!