Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ

Spread the love

राजभवन येथे राज्य  सैनिक कल्याण विभागाच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा व मुलगी उमंग यांच्याशी संवाद साधला.

यावेळी लेफ्टनंट कर्नल  श्री. आर. आर. जाधव,  शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या पत्नी श्रीमती उमा कुणाल गोसावी, मुलगी उमंग कुणाल गोसावी,  नाईक श्री. नंदकुमार चावरे,  सुभेदार श्री. संजयकुमार मोहिते,  एनसीसी अधिकारी श्री. बाळासाहेब शिंदे,  एनसीसी  विद्यार्थी  अमंग रुपेली,  संकेत कदम, विजयश्री सुरदे,  प्रीती जगदाळे आदी उपस्थित होते.

आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सैनिक कायम कार्यरत असतात. या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने यामध्ये आपला अधिकाधिक सहभाग द्यावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

ध्वजदिन निधी संकलन करणाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

माजी सैनिक कल्याण विभागाच्या वतीने सह्याद्री अतिथीगृह येथे सशस्त्र सेना ध्वजदिन 2019 निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सशस्त्र सेना ध्वज दिन संकलनात महत्त्वपूर्ण सहभाग देणाऱ्यांचा राज्यपाल महोदय आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांना सशस्त्र सेना दिवसाचे बॅजेस लावण्यात आले आणि ध्वजदिन निधीत सहभाग देणाऱ्यांकडून  निधी संकलित करण्यात आला.

राज्यपाल श्री. कोश्यारी यावेळी म्हणाले, आपण सर्वांनी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी निधी संकलन करणे हे समाजातील मोठे योगदान आहे. आज याच सैनिकांमुळे आपण सुरक्षित असून सैनिकांच्या कुटुंबाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्ताने संकलित केलेला निधी सैनिक, माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा आणि मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येतो. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी ध्वजदिन निधी संकलनात पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्यपाल महोदयांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सतीश जोंधळे, व्हाईस ॲडमिरल अजित कुमार, मेजर जनरल राज सिन्हा, ग्रुप कॅप्टन एस.एन.बावरे, सैनिक कल्याण विभागाचे संचालक के.लक्ष्मीनारायण मिश्रा उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्री. बोरीकर यांनी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याने ध्वजदिन निधी संकलनाकरिता देण्यात आलेले उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण केल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. जोंधळे यांनी सैन्य दलाप्रति आदरभावना दर्शविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून सर्वांनी अधिकाधिक सहभाग द्यावा असे आवाहन केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!