Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Hyderabad Encounter : पीडितेच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली न्याय मिळाल्याची भावना , निर्भयाच्या आईकडूनही हैद्राबाद पोलिसांचे स्वागत

Spread the love

हैदराबादेतील  महिला डॉक्टरवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश सुन्न झाला होता. दरम्यान  घटनास्थळावर आरोपींना नेण्यात येत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी झालेल्या चकमकीत चारही आरोपींचा खात्मा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या या कामगिरीचं लोकांकडून कौतुक करण्यात येत आहे. घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांवर लोकांनी पुष्पवर्षावही केला.

सदर एनकाऊंटरची माहिती मिळताच घटनास्थळावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. ज्याच्या कानावर ही माहिती पडली, त्याने घटनास्थळाकडे धाव घेतली. लोकांना सांभाळण्यासाठी पोलिसांना मोठी मेहनतही करावी लागली. जमाव पाहता अतिरिक्त तुकडी मागवण्यात आली.

या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांसह  देशभरातील अनेक दिग्गजांनी या चकमकीचं समर्थन केलं आहे. तेलंगणाचे कायदे मंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी तर हा देवानेच दिलेला न्याय असल्याची प्रतिक्रिया दिली. पीडितेच्या वडिलांनी सरकारचे आभार मानत मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी प्रतिक्रिया दिली. या घटनेनंतर पीडितेची बहिण म्हणाली, ‘एनकाऊंटरची बातमी ऐकून आनंद झाला. यामुळे एक उदाहरण निर्माण झालं आहे. बहिणीला विक्रमी वेळेत न्याय मिळाला. या कठीण प्रसंगात आमची साथ दिलेल्या प्रत्येकाची मी आभारी आहे.

दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेल्या नागरिकांनी एसीपी जिंदाबाद आणि डीसीपी जिंदाबादच्याही घोषणा दिल्या. हैदराबादसह देशभरातून या एनकाऊंटरचं समर्थन होत आहे. एमआयएमचे खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्यासह अनेकांनी मात्र या एनकाऊंटरवर प्रश्नचिन्हही उपस्थित केलं आहे.

दिल्लीतील सामूहिक बलात्काराची बळी ठरलेली निर्भया हिच्या आईनेही चार आरोपींच्या एन्काउंटरनंतर  हैदराबाद पोलिसांना धन्यवाद दिले आहेत. यापेक्षा मोठा न्याय कोणताही असू शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. आता लवकरात लवकर निर्भयाच्या दोषींना फाशीची शिक्षा मिळायला हवी असेही त्या म्हणाल्या. या दोषींना शिक्षा मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे कायद्याच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असेही त्या म्हणाल्या.

दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही एन्काउंटर प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण अतिशय समाधानी असल्याचे त्या म्हणाल्या. महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ मालीवाल आमरण उपोषणाला बसल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!