Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री आज पुणे दौऱ्यावर , स्वागताच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मोदी यांचा आज सामना !!

Spread the love

महायुतीतील भाजपची साथ सोडून राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच समोरासमोर येत आहेत.  पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी पंतप्रधान मोदी उद्या दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी पुणे विमानतळावर राजशिष्टाचारानुसार त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत.  दरम्यान महाराष्ट्रात महिनाभर चाललेल्या सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हि पहिलीच भेट असून या भेटीविषयी सर्वांनाच मोठी उत्सुकता लागली आहे.

पुण्यात होणाऱ्या पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या वार्षिक परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (६ डिसेंबर) रात्री १० वाजता पुण्यात दाखल होत आहेत. राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींचे पुण्यातील लोहगाव विमानतळावर स्वागत करण्यासाठी जाणार आहेत. मुंबई येथून विमानाने निघून रात्री नऊच्या सुमारास मुख्यमंत्री ठाकरे पुणे विमानत‌‌ळावर दाखल होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचे विमानत‌ळावर स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्री लगेचच रात्री १० वाजून १० मिनिटांनी मुंबईकडे रवाना होणार आहेत.

पुण्यात उद्यापासून पोलीस महासंचालकांच्या तीन दिवसीय परिषदेस सुरूवात होत आहे. यासाठी पंतप्रधान मोदी दोन दिवस तर गृहमंत्री अमित शाह तीन दिवस पुण्यात असणार असल्याची माहिती आहे.  विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देखील आज  पुण्यात असल्याचे वृत्त आहे. मात्र त्यांच्या भेटीचा आणि दौऱ्याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ डिसेंबर रोजी पोलीस महासंचालक परिषदेत सहभागी होणार होतील त्यानंतर ८ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते ६.४५ वाजेपर्यंत पंतप्रधान योग शिबिरात भाग घेणार आहेत. पंतप्रधानांचा हा तीन दिवसीय महाराष्ट्र दौरा आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात येते. या परिषदेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेसुद्धा पुण्यात येत असून त्यांचा पुण्यात तीन दिवस मुक्काम असणार आहे. त्यामुळे या परिषदेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी असलेली ३० वर्षांची मैत्री तोडून  मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लवकरच दिल्लीत जाऊन आपण ( मोठ्या भावाची ) पंतप्रधान मोदींची भेट घेणार असे सांगितले होते. उद्धव यांची ही दिल्लीवारी लवकरच होण्याची शक्यता असताना त्याआधीच पंतप्रधान पुण्यात येत असल्याने दिल्लीऐवजी महाराष्ट्रातच पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव यांची सत्तासंघर्षानंतरची पहिली भेट होणार आहे. सत्तासंघर्षाला पूर्णविराम मिळाल्यानंतर अवघ्या ९ दिवसांतच हे दोन नेते समोरासमोर येत आहेत.

ही तीन दिवसांची परिषद पूर्वनियोजीत होती. देश पातळीवरील ही परिषद असल्याने या अगोदर देशभरातील अन्य शहरांमध्येही ही परिषद पार पडली आहे. तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर व शिवसेनेने एनडीएची साथ सोडल्यानंतर पंतप्रधान मोदी  पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. उद्या रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी पंतप्रधान मोदी यांचे पुणे विमानतळावर आगमन होणार आहे. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विमानतळावर जाणार असल्याची माहिती आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. यानंतर पंतप्रधानांच्या दोन दिवसीय दौऱ्याला सुरूवात होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!