Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Chaityabhumi Mumbai : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी उसळला निळा भीमसागर, गर्दीचा उच्चांक…मुख्यमंत्री आज चैत्यभूमीवर

Spread the love

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर हजारो भीमसैनिक दाखल होत  आहेत. हातात निळा झेंडा घेऊन डोक्याला ‘जयभीम’ची निळी पट्टी बांधून देशाच्या कानाकोपऱ्यातून भीम अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाल्याने शिवाजी पार्कवर जणू निळा भीमसागर उसळल्याचे  चित्र निर्माण झाले  आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासनानेही जय्यत तयारी केली असून शिवाजी पार्कवर सर्व सोयी -सुविधा देण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या सकाळी चैत्यभूमीवर जाऊन आंबेडकरांना अभिवादन करणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ३ डिसेंबरपासूनच देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भीमसैनिक ‘जयभीम’चा जयघोष करत चैत्यभूमीवर येत आहेत. आज सकाळपासून तर चैत्यभूमीकडे येणाऱ्या भीम अनुयायांची संख्या प्रचंड वाढत आहे. कुटुंबकबिल्यासह हजारो भीमसैनिक चैत्यभूमीवर येऊन महामानवाला अभिवादन करत आहे. यंदा चैत्यभूमीवर गर्दीचा उच्चांक होणार असल्याचे  सांगण्यात येत आहे. कालपासूनच शिवाजी पार्क परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे. आंबेडकरी गायक, कलावंत भीमगीते  गाऊन आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आज बाबासाहेबांना अभिवादन 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आज  सकाळी ७.४५ वाजता चैत्यभूमीवर येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी पुण्याला रवाना होणार आहेत.

डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था

मुंबई महापालिका झाली सज्ज : महापौर 

महापरिनिर्वाणदिनी मुंबई महापालिकेने केलेल्या सोयी सुविधांची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेने देश–विदेशातून येणाऱ्या अनुयायांसाठी‍ तात्पुरत्या निवासाची, आरोग्य केंद्र, आहाराची तसेच विविध नागरी सेवा-सुविधांची चोख व्यवस्था केली असून  या सर्व सेवा-सुविधांची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती देणारी पुस्तिका जनसंपर्क विभागाने संकलित केली आहे. या सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही  मुंबईच्या किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते शिवाजी पार्क मैदानावरील महापालिकेच्या प्रदर्शन कक्षात आज करण्यात आले.

यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या सोयी-सुविधांची माहिती दिली. यावेळी महापालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत, सुधार समिती अध्यक्ष सदानंद (सदा) परब, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर, नगरसेवक श्रीकांत शेटये, रामदास कांबळे, नगरसेविका रोहिणी कांबळे, उर्मिला पांचाळ, प्रविणा मोरजकर, वैशाली शेवाळे, प्रतिभा खोपडे, चंद्रावती मोरे, समिता कांबळे, महापालिका उप आयुक्त (घ.क.व्य.) अशोक खैरे, महापालिका उप आयुक्त (परिमंडळ – २) नरेंद्र बरडे, ‘जी/उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान शिवाजी पार्क परिसरात महापालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे उभारण्यात आलेल्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र प्रदर्शनाचे  उद्घाटनही महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवाजी पार्क मैदानात भीमसैनिकांसाठी दिशादर्शक असा मोठा फुगाही आकाशात सोडण्यात आला.  चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे शामियाना व व्ही. आय. पी. कक्षासह नियंत्रण कक्षाबरोबरच चैत्यभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्ग आदी ठिकाणी रुग्णवाहिकेसह आरोग्य सेवेची व्यवस्था करण्यात आली आहे.

अशी असेल व्यवस्था 

चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी १ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा उभारण्यात आला असून  शिवाजी पार्क मैदान व परिसरात १८ फ‍िरती शौचालये (१८० शौचकुपे), दर्शन रांगेतील अनुयायांसाठी ४ फ‍िरती शौचालये (४० शौचकुपे),  पिण्याच्या पाण्याच्या ३८० नळांची व्यवस्था, त्याशिवाय संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात १६ टँकर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तर आपत्कालीन सुरक्षेसाठी अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले असून चैत्यभूमीलगतच्या चौपाटीवर सुरक्षारक्षकासहित बोटींची व्यवस्थाही करण्यात आली आहे. चैत्यभूमी येथील आदरांजलीचे शिवाजी पार्कात मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपणही करण्यात येत आहे.  शिवाजी पार्क परिसरात ४६९ स्टॉल्सची रचना करण्यात आली असून  दादर (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळ आणि एफ/उत्तर, चैत्यभूमी व शिवाजी पार्क, दादर (पूर्व) स्वामी नारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष / माहिती कक्ष उभारण्यात आला आहे.

‘राजगृह’ येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष स्थापन करण्यात आला असून स्काऊट गाईड हॉल येथे बौद्ध भिक्खूंसाठी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाजी पार्क मैदानात धुळीचा त्रास रोखण्यासाठी पायवाटांवर अच्छादन करण्यात आले आहे. भ्रमणध्वनी चार्जिंगकरि‍ता शिवाजी पार्क मैदानातील मंडपात ३०० पॉइंटची व्यवस्था करण्यात आली असून फायबरचे २०० तात्पुारते स्नानगृह व ६० तात्पुरती शौचालये,  इंदू मिलमागे फायबरची तात्पुरती ६० शौचालये व ६० स्ना‍नगृहे , वडाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) येथेही  तापुरत्या निवाऱ्यासह फि‍रत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी ओबीसींचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर , खा. अमर साबळेंची बौद्धिक दिवाळखोरी

आपलं सरकार

Click to listen highlighted text!