Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Uttarpradesh : जामिनावर बाहेर आलेल्या आरोपींकडून बलात्कार पीडितेला जाळून मारण्याचा प्रयत्न

Spread the love

हैदराबामधील महिला डॉक्टरच्या हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटलेले असतानाच उन्नावमध्येही  एका सामूहिक बलात्कार पीडितेला पेट्रोल टाकून जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण उन्नाव हादरले आहे. पीडितेला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या पीडितेला जाळून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,पीडिता आज (गुरुवारी) पहाटे चार वाजता रायबरेलीला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी बैसवारा बिहार रेल्वे स्थानकात जात असताना ही घटना घडली. गौरा फाट्यावर गावातील हरिशंकर त्रिवेदी, किशोर शुभम, शिवम, उमेश यांनी पीडितेला घेरले आणि तिच्या डोक्यावर काठी आणि गळ्यावर चाकूने वार केले. दरम्यान, चक्कर आल्याने पीडिता खाली कोसळली. त्यानंतर या सहा जणांनी तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले, असे  पीडितेने जबाबात म्हटले आहे. पीडितेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास रायबरेली पोलिसांनी केला होता. या प्रकरणातील हे आरोपी जामिनावर सुटले आहेत. पीडितेला जाळल्यानंतर तिचा आरडाओरड ऐकून लोक धावून येत असल्याचे पाहून आरोपींनी तेथून पलायन केले. यापूर्वी याच सहा जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने सांगितले. या घटनेची माहिती मिळताच डीएम देवेंद्र पांडे, एसपी विक्रांत वीर यांच्यासह अनेक पोलिस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पीडितेने ५ आरोपींची नावे दिली आहेत. यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तिघांचीही चौकशी केली जात आहे. इतर दोघांचा शोध सुरू आहे, अशी माहिती उन्नावच्या पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

पीडितेने दिलेल्या जबाबाच्या आधारे ही घटना घडल्यानंतर तत्काळ तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे. पालिसांनी जेंव्हा अटकेची कारवाई केली तेंव्हा  हे सर्व आरोपी आपापल्या कुटुंबीयांसोबत आपल्या घरातच होते. या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेशी संबंधित धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून त्याआधारे पोलीसांचा तपास सुरू आहे.

या प्रकरणी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवरटीका केली आहे. काल देशाचे गृहमंत्री (अमित शहा) आणि आज मुख्यमंत्री (योगी आदित्यनाथ) हे खोटे बोलले आहेत. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली झाली असल्याचे ते म्हणाले. दररोज अशा प्रकारच्या घटना घडताना पाहून संताप येतो. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आता खोट्या प्रचारातून बाहेर पडायला हवे, असे प्रियांका गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!