Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे सत्ताकारण : नव्या सरकारच्या खातेवाटपाची आज शक्यता , विस्तार मात्र लांबणीवर , काँग्रेस -राष्ट्रवादीचे अद्याप ठरेना….

Spread the love

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेनंतर महाविकासआघाडीचे रखडलेले खातेवाटप आज होण्याची शक्यता आहे. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अद्यापही कोणाला कोणतं मंत्रीपद द्यायचं यावरुन अद्याप चर्चा सुरुच  असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, काँग्रेस नेते दिल्लीत गेले असून खातेवाटपासंबंधित चर्चा करण्यात आल्याचं कळत आहे. मंत्रिमंडळाची दुपारी ३ वाजता बैठक पार पडणार असून या बैठकीत खातेवाटपावर चर्चा होऊ शकते. खातेवाटपात एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ यांचे खातेवाटप आज ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान नागपुरात १६ ते २१ डिसेंबर  हिवाळी अधिवेशन पार पडणार असून त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार होणं अशक्य आहे. त्याचे कारण एक तर काँग्रेसकडून संभाव्य मंत्र्यांची नवे समजली नाहीत आणि दुसरे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारदेखील हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात इच्छुक नसल्याचे सांगितले जात आहे. कारण खातेवाटपासंबंधी अद्यापही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चर्चा झालेली नाही. त्यामुळे ही चर्चा होऊन त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी वेळ लागू शकतो असे सांगितले जात आहे.

महाविकास आघाडीचा मंत्रिपदाच्या वाटपाचा जो फॉर्म्युला ठरला होता त्यानुसार शिवसेनेला १६ मंत्रिपद, राष्ट्रवादीला १४ आणि काँग्रेसला १२ मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात नेमका कुणाचा समावेश होणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांत खातेवाटप जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं. “बहुमत चाचणी, अध्यक्षांची निवडीची प्रक्रिया पार पडली, या सर्वातून आम्ही आता मोकळे झालो आहोत, त्यामुळे यापुढील काम वेगाने करु. खातेवाटपही एक दोन दिवसांत करु, तुर्तात आम्ही सातही मंत्री सगळी खाती एकत्रितपणे हाताळत आहोत. त्यामुळे राज्याला पुढे जाण्यासाठी कुठेही अडथळा निर्माण होत नाही. म्हणून अद्याप खातेवाटप झालेले नाही मग आता काय होणार अशी काळजी करण्याचे कारण नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.

दरम्यान शिवसेनेकडून एकनाथ शिंदे,  सुभाष देसाई यांच्याविषयी अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी कडून  जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्यासह  धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील, मकरंद पाटील आणि राजेश टोपे. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत यांच्यासह अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण,  विजय वडेट्टीवार, के.सी. पडवी, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सतेज पाटील आणि सुनील केदार यांच्या  नावाचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!