Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra : महाविकास आघाडी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल , शरद पवार पूर्णतः आशावादी….” भाजपच्या तुलनेने शिवसेनेसोबत काम करणे सोपे “

Spread the love

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे शिल्पकार  शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. वेगवेगळ्या विचारधारांचे पक्ष एकत्र आलेत, हे सत्य असले तरी या आघाडीत पूर्णपणे एकवाक्यता आहे. समान किमान कार्यक्रम केंद्रस्थानी ठेवून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत, असे नमूद करतानाच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील सरकार आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शरद पवार यांच्या मुलाखती सध्या चांगल्याच गाजत आहेत. परवा  एबीपी न्यूजला सविस्तर मुलाखत देऊन चर्चतल्या बातम्या दिल्या होत्या.  काल पुन्हा त्यांनी आणखी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीतही त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली मते मांडत महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर  पुन्हा एकदा प्रकाश टाकला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेने केलेली मैत्री कशी महाराष्ट्रातील आणि देशातील सध्याच्या राजकीय स्थितीला अनुकूल आहे, हे पवारांनी पटवून दिले. भाजपचा मार्ग आम्ही चोखाळू शकत नाही, असं स्पष्ट करताना भाजपच्या तुलनेत शिवसेनेसोबत काम करणे मला निश्चितच सोपे वाटते, असे शरद पवार म्हणाले.

अजित पवार यांच्या चर्चित बंडाविषयी बोलताना ते म्हणाले , नेहरू सेंटरमधील बैठकीत काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याशी माझा सत्तावाटपावरून टोकाचा वाद झाला. या प्रकाराने अजित पवार नाराज होते. आपली अस्वस्थता त्यांनी आमच्या अन्य एका नेत्याकडे बोलून दाखवली. आताच ही स्थिती असेल तर आपण एकत्र येऊन सरकार कसे चालवणार, असा सवाल करून ते त्या बैठकीतून निघून गेले होते, असा घटनाक्रम पवारांनी सांगितला. एकीकडे काँग्रेस-शिवसेनेशी चर्चा सुरू असताना भाजप आणि राष्ट्रवादीतही समांतर चर्चा सुरू असल्याची मला कल्पना होती. ही चर्चा केवळ वैचारिक पातळीवर आणि प्राथमिक स्तरावर होती. त्यातून अजित पवार हे भाजपसोबत जाण्याचा निर्णय अशाप्रकारे घेतील, याची जराही कल्पना माझ्यासह राष्ट्रवादीच्या अन्य कोणत्याही नेत्याला नव्हती, असे पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

ज्या प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरू होती त्यावरून अजित पवार नाराज होते. या चर्चेच्या गुऱ्हाळाला कंटाळूनच त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. राजीनामा दिल्यानंतर झालेल्या भेटीत त्यांनी मला हे सांगितले, असे पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांनी उचललेले पाऊल अत्यंत चुकीचे होते. त्यामुळेच त्यांना तूर्त मंत्रिपद देण्यात आलेले नाही, असेही पवारांनी पुढे नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांचे चांगले वजन आहे, अशी प्रांजळ कबुली देतानाच महाराष्ट्रात विराजमान झालेल्या नव्या सरकारमध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार का, यावर मात्र पवारांनी कुठलेही भाष्य केले नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!