आपलं सरकार : चैत्यभूमीवरील महापरिनिर्वाण दिनाची तयारी पूर्ण , ना. सुभाष देसाई यांनी घेतला आढावा

Advertisements
Advertisements
Spread the love

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य शासन व महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आज मंत्री सुभाष देसाई यांनी आढावा घेतला. यंदा दरवर्षीपेक्षा जास्त अनुयायी येण्याची शक्यता गृहित धरून त्याप्रमाणे नियोजन करावे. तसेच अनुयायांना देण्यात येणाऱ्या अन्नाचा दर्जा उत्कृष्ट ठेवण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

Advertisements

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीत श्री. देसाई यांनी राज्य शासन, पोलीस, बृहन्मुंबई महानगरपालिका, बेस्ट यांनी केलेल्या तयारीसंदर्भात माहिती घेतली.

Advertisements
Advertisements

महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी  व शिवाजी पार्क येथे अनुयायांसाठी विविध सोयी देण्यात येतात. चैत्यभूमी, अशोक स्तंभ, भीमज्योत यासह संपूर्ण परिसराची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.  तसेच दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. सहा डिसेंबर रोजी शासकीय मानवंदना देण्यात येणार असून, हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टीही करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

राज्यभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी शिवाजी पार्क येथे निवासासाठी मंडप टाकण्यात येत आहे. तसेच येथे एलईडी स्क्रिन, भोजन मंडपाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी १६ टँकर व ३८० नळांची व्यवस्था, १८ मोबाईल शौचालय व १२० फायबर शौचालये, २६० स्नानगृह, परिसरात विद्युत दिव्यांची सोय, समुद्र किनाऱ्यावर ४८ जीव रक्षकांची नेमणूक, मंडपामध्ये ३०० मोबाईल चार्जिंग पॉइंट आदी व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाजी पार्क व चैत्यभूमी परिसरात ३ वैद्यकीय कक्ष उभारण्यात येणार असून ११ रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत. या ठिकाणी आरोग्य तपासणी व औषधाचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

पोलीस दलाच्या वतीने परिसरात योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच १०० सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येत असून, शिवाजी पार्क व चैत्यभूमी येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना देसाई म्हणाले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनाने योग्य तयारी केली आहे. अनुयायांना कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी विशेष सूचना दिल्या आहेत. महापालिकेनेही चांगले नियोजन केले आहे. राज्य शासनाच्या वतीने शिवाजी पार्क येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चित्रपट दाखविण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने काढण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेची संख्या पन्नास हजारावरून दीड लाख करावी. जेणेकरून सर्व अनुयायांना ती सुलभपणे मिळू शकेल. तसेच इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे चित्र परिसरात लावण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

विविध संस्था, संघटनांतर्फे शिवाजी पार्कवर देण्यात येणाऱ्या अन्नदानाचा दर्जा चांगला असावा व ते सुरक्षित असेल, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने काळजी घ्यावी, असेही मंत्री श्री.देसाई यांनी यावेळी सांगितले. आमदार आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेने इंदू मिल येथील स्मारकाचे छायाचित्र चैत्यभूमी परिसरात लावावे तसेच पावसाची शक्यता गृहित धरून आपत्कालीन व्यवस्था योग्य रितीने करावी, अशी सूचना केली.

यावेळी आमदार भाई गिरकर, माजी आमदार सचिन अहिर, अर्जुन डांगळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सिद्धार्थ कासारे, रवी गरूड तसेच मनोज संसारे यांच्यासह विविध विभागाचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

आपलं सरकार