आपलं सरकार : उपराष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्राला चार राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार प्रदान

Advertisements
Advertisements
Spread the love

अपंगत्वावर मात करून विविध क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या महाराष्ट्रातील 3 दिव्यांग व्यक्ती आणि  दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका संस्थेला आज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने गौरविण्यात आले.

Advertisements

नवी मुंबई येथील वनिता अय्यर यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला कर्मचाऱ्याचा पुरस्कार, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील डॉ. भावेश भाटिया यांना ‘रोल मॉडेल’ पुरस्कार आणि मुंबई येथील मानसी जोशी यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला खेळाडूचा  पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर दिव्यांगपूरक  संकेतस्थळ निर्मितीसाठी मुंबईच्या मालाड (पश्चिम)  येथील  रायजींग फ्लेम संस्थेला सन्मानित करण्यात आले.

Advertisements
Advertisements

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने आज जागतिक अपंग दिनानिमित्त येथील विज्ञान भवनात देशातील दिव्यांग व्यक्ती आणि  दिव्यांगांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना ‘राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार- २०१९’ प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विविध १४ श्रेणींमध्ये देशातील व्यक्ती व संस्थांना एकूण ६५ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री सर्वश्री रामदास आठवले, कृष्णपाल गुर्जर, रतनलाल कटारिया आणि मंत्रालयाच्या सचिव शकुंतला डोले गॅमलीन यावेळी उपस्थित होत्या.

नवी मुंबईच्या घणसोली परिसरातील वनिता अय्यर यांना जन्मत: बहिरत्व आहे.  या दिव्यंगत्वावर मात करत त्यांनी सामान्य मुलांच्या शाळेत व महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केले, या काळात त्यांनी शिष्यवृत्तीही मिळविली. इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन विषयात अंभियांत्रिकी पदवी मिळवून वनिता अय्यर या सध्या ‘न्यू इंडिया इन्शोरन्स कंपनी’ मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. वनिता अय्यर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला कर्मचारी’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील ४९ वर्षीय डॉ. भावेश भाटिया हे जन्मांध आहेत. दिव्यांगत्वावर मात करत भाड्याच्या हातगाडीवर मेणबत्त्या विकून त्यांनी उद्योजकतेकडे वाटचाल केली. डॉ. भाटिया यांनी ‘सनराईज कँडल्स’ ही मेणबत्ती उत्पादक कंपनी उभारली.  या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले डॉ.भाटिया आता ६५ देशांमध्ये  आपले  उत्पादन  निर्यात करीत आहेत. डॉ. भाटिया यांनी पीएचडी मिळवली असून ते भारतातील  पहिले पीएचडीधारक अंध व्यक्ती  ठरले आहेत.  डॉ. भाटिया यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘रोल मॉडेल’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

मुंबईच्या बॅलार्ड एस्टेट परिसरातील मानसी जोशी यांचा वयाच्या 22 व्या वर्षी एका अपघातात एक पाय निकामी झाला. बॅडमिंटन खेळाडू असलेल्या मानसी जोशी यांनी दिव्यांगत्वावर मात करत क्रीडा क्षेत्रातील वाटचाल सुरुच ठेवली .यानंतर, त्यांनी  १९ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सहभाग घेवून 25 पदक मिळवीली. तर राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेवून २ पदके अर्जित केली. मानसी जोशी यांनी वर्ष 2015 आणि 2017 च्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेतही सहभाग घेतला. मानसी जोशी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला खेळाडू’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

‘रायजिंग फ्लेम’ ठरले सर्वोत्तम दिव्यांगपूरक संकेतस्थळ

दिव्यांगपूरक  संकेतस्थळ निर्मितीसाठी देशातून तीन संस्थांना आज सन्मानित करण्यात आले. खाजगी  क्षेत्रातून मुंबईच्या मालाड (पश्चिम) येथील रायजिंग फ्लेम या संस्थेच्या संकेतस्थळाला सर्वोत्कृष्ट दिव्यांग सुगम संकेतस्थळाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या संस्थापक संचालक निधी गोयल यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विविध दिव्यांग व्यक्तींना सोयीचे ठरेल अशा प्रकारे हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. संकेतस्थळाच्या वरच्या  उजव्या बाजूस देण्यात आालेला टॅब हे या संकेतस्थळाचे खास वैशिष्ट्य  आहे.

आपलं सरकार