महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे नाना पटोले तर देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्ष नेते म्हणून निवड

Spread the love

काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांची बिनविरोध विधानसभाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या बिनविरोध निवडीनंतर त्यांचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. शेतकरी पुत्र विधानसभा अध्यक्ष झाल्याचा मला आनंद झाला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना सभागृहात व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान विरोधी पक्ष नेते म्हणून भाजपचे गट नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाली आहे.

भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर  ही निवडणूक बिनविरोध पार पडली. काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली आहे. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी निवडीची घोषणा केली. त्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षाचा पदभार स्वीकारला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले व स्वागत केले. महाराष्ट्राचा शेतकरी पुत्र विधानसभा अध्यक्ष झाल्याचा मला आनंद झाला आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात बोलताना म्हणाले की, हे सभागृह राज्याचे सर्वोच्च सभागृह आहे. सर्व परिस्थिवर मात करीत तुम्ही इथपर्यंत आले आहात. जनतेचे सर्व प्रश्न मार्गी लावत या ठिकाणी पोहोचला आहात. तुमचा स्वभाव हा बंडखोर आहे, मला माहिती आहे. आपलं मत मांडण्यासाठी कुणाचीही पर्वा न करता धाडस दाखवणारा महाराष्ट्राचा सुपुत्र अशी तुमची ओळख आहे, असे म्हणत त्यांनी त्यांचे स्वागत केले. पुढे बोलताना उद्धव म्हणाले, माझ्याकडून काही चुका राहिल्यास आपले २५-३० वर्षाचे जे काही नाते होते त्याची आठवण ठेऊन सहकार्य करा, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष भाजपला चिमटा काढला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याचे सभागृहात दिसले.

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सभागृहात त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. भाजपचे विधीमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवसी यांनीही  पटोले यांचे अभिनंदन केले. ‘विरोधी पक्षाला अध्यक्षाचाच आधार असतो,’ असे सांगत फडणवीस यांनी ‘अध्यक्ष महोदयांनी विरोधक बसतात त्या डाव्या बाजुने जास्त ऐकावे आणि उजव्या बाजुने कमी ऐकावे,’ अशी विनंती पटोले यांना केली. फडणवीस पुढे म्हणाले, ‘किसन कथोरे यांचा अर्ज आम्ही मागे घेतला. अध्यक्षांची एकमताने निवड होतेय याचा आम्हाला आनंद आहे. आपला आणि माझा संबंध जुना आहे. आपण विरोधी पक्षात होतात तेव्हाही आपले चांगले संबंध होते. आपल्याला दोन्ही बाजुंच्या नेत्यांच्या मर्यादा, त्यांच्या क्षमता, आशा आकांक्षा माहित आहेत. अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडताना याचा आपल्याला निश्चितच फायदा होईल.’

भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. विधानसभा अध्यक्ष हा बिनविरोध व्हावा ही महाराष्ट्राची परंपरा आहे.  विधानसभा अध्यक्षांची निवड यंदाही बिनविरोध व्हावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आग्रह धरला होता. त्यामुळे मी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर व सविस्तर चर्चा केली. त्यानंतर भाजपने या निवडणुकीतून माघार घेण्यासंबंधीचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

आपलं सरकार