Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधासभा : काय बोलले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या पहिल्या भाषणात ?

Spread the love

विधानसभेत बहुमत सिद्ध करत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाषण केलं. यावेळी बोलताना त्यांनी मैदानातला माणूस सभागृहात आल्यावर कसं वागायचं याबाबत थोडा दबाव होता, पण येथे आल्यावर कळलं , यापेक्षा मैदानाच बरं असं म्हणत भाजपावर टीका केली. अधिवेशन सुरु होताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत हे अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. तसंच घोषणाबाजी करण्यात आली. बहुमत चाचणी सुरु होण्याआधी भाजपाच्या आमदारांनी सभात्याग केला. या सर्व प्रकारामुळे उद्धव ठाकरे यांनी यापेक्षा मैदान बरं म्हणत भाजपा आमदारांना टोला लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात आमदार आणि जनतेचे आभार मानले. ते म्हणाले कि , “सभागृहाने माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी आभार, पण सर्वात आधी त्या जनतेचे आभार ज्यांच्यामुळे मी येथे आहे. छत्रपती शिवराय हे आमचं दैवत, त्यांना वंदन करुन मी सभागृहात प्रवेश करत आहे. मैदानातला माणूस सभागृहात आल्यावर कसं वागायचं याबाबत थोडा दबाव होता, पण इथे आल्यावर कळलं यापेक्षा मैदानाच बरं आहे. ”

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीवरुन घेतलेल्या आक्षेपावर बोलताना, छत्रपती शिवाजी महाराज, आई-वडिलांची शपथ घेणं हा गुन्हा असेल तर तो मी सातत्याने करेन असं उत्तर त्यांनी दिलं. सर्वांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे असा निर्धार  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीदरम्यान महाविकास आघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. उद्धव ठाकरे सरकारने अत्यंत सहजपणे बहुमत सिद्ध केलं आहे. १६९ आमदारांनी उद्धव ठाकरे सरकारला समर्थन दिलं. तर चार आमदारांनी यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. भाजपाने सभात्याग केल्याने विरोधात एकही मत पडलं नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!