Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra : महाविकास आघाडीच्या शपथविधीवर भाजपचा आक्षेप , राज्यपालांकडे केली तक्रार

Spread the love

भारतीय जनता पक्षाचे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाआघाडीच्या मंत्र्यांचा शिवाजी पार्क मैदानावर झालेला शपथविधी नियमबाह्य असल्याचे सांगत आक्षेप घेतला आहे. ‘या शपथविधीवेळी आमदारांना त्यांच्या नेत्यांची नावे घेतली, हे संविधानाच्या चौकटीत बसणारे नसून नियमबाह्य आहे. त्यामुळे हा शपथविधी रद्द करावा, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे,’ अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

गेल्या महिनाभराच्या राजकीय सत्तानाट्यानंतर अखेर महाविकास आघाडीचा शपथविधी समारंभ शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आणि तिन्ही पक्षांच्या एकूण सहा आमदारांनी शपथ ग्रहण केले. मात्र मंत्रिपदाची शपथ घेताना कुणी छत्रपती शिवरायांचे तर कुणी त्यांच्या पक्ष प्रमुखांचे नाव घेतले. अशा पद्धतीने नावे घेऊन शपथ घेणे नियमबाह्य असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. ‘महाविकास आघाडीच्या सरकारने सत्तेत आल्याआल्याच सर्व नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केली आहे,’ अशी टिप्पणीही पाटील यांनी केली. खरे पाहता याविरोधात न्यायालयाकडे दाद मागायला हवी, मात्र आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे हा शपथविधी रद्द करण्याची मागणी केली आहे,’ असे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान भाजपला प्रत्युत्तर देताना महाविकास आघाडीतर्फे नवाब मलिक म्हणाले, ‘जी प्रथा या देशात सुरू झाली आहे, ती प्रथा भारतीय जनता पक्षानेच सुरू केली आहे. भाजपने हा पायंडा रचला आहे. त्यांनी बदलाची सुरुवात स्वत:पासून करावी आणि देशभरात ज्या राज्यांत आणि लोकसभेत त्यांचे शपथविधी पाहावेत आणि बदलावेत. भाजपने आम्हाला धमक्या देऊ नयेत.’

सभागृहात बहुमत सिद्ध झाल्यानंतर सर्व आमदारांनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी बच्चू कडू यांनी म्हटलं की, “उद्धव ठाकरे हे राजकारणातील हरिश्चंद्र आहेत असे मी मानतो. उद्धव ठाकरे शब्दाला जागणारे असून बाळासाहेबांकडून त्यांना राजकारणातील बाळकडू मिळालं आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो”.

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचा शपथवीधीदरम्यान जर उल्लेख झाला तर भाजपाला राग का यावा. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल भाजपाला असूया आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी केला.

विधानसभेचं विशेष अधिवेशन शनिवार आणि रविवारी असे दोन दिवस  बोलावण्यात आलं आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत जोरदार हंगामा झाल्याचं पहायला मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या मंत्र्यांची ओळख करून देत असताना भाजपाच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली. तसंच यावेळी मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी पुन्हा शपथ घेण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांनी घेतलेली शपथ योग्य नसल्याचंही ते म्हणाले. कामकाजादरम्यान भाजपा आमदारांकडून सभात्याग करण्यात आला. दरम्यान, शपथविधीचा विषय हा राज्यपालांच्या अखत्यारितील विषय असून त्यावर भाष्य करणार नसल्याचं स्पष्टीकरण विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!