Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : संचित रजेवरील फरार आरोपी अखेर जेरबंद , भावजयीच्या खुनाची भोगत होता शिक्षा

Spread the love

न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर एक महिन्यांच्या संचित रजेवर गेल्यानंतर पुन्हा कारागृहात हजर न होता बारा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा पोलिसांनी मालेगावातून अटक केली आहे. मोहम्मद अल्तमश मोहम्मद ईस्माईल (४८, रा. आरेफ कॉलनी) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर भावजयीचा पेटवून खुन केल्याचा आरोप आहे.

जुनाबाजारातील इमरान खानची पत्नी सायरा हिला २० मे १९९९ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पती इमरान, मोहम्मद अल्तमश आणि सासू रियाझ ईस्माईल यांनी पेटवून दिले होते. तिचा दुस-या दिवशी सकाळी पावणेदहाच्या सुमारास मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्यावेळी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाची सुनावणी ७ जुलै २००० साली झाली. जिल्हा व सत्र न्यायालयाने याप्रकरणातील इमरान खान व रियाझ ईस्माईल यांना दोषमुक्त केले होते. तर मोहम्मद अल्तमशला जन्मठेप व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्याविरोधात मोहम्मद अल्तमशने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मात्र, खंडपीठाने देखील त्याची शिक्षा २००४ साली कायम ठेवली. त्यानंतर त्याची हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली होती. शिक्षा भोगत असताना २००७ साली त्याने एक महिन्याची संचित रजा घेतली. रजेचा कालावधी संपुष्टात आल्यावर देखील तो कारागृहात परत गेला नाही. त्यामुळे २०१३ मध्ये त्याच्याविरुध्द बेगमपुरा पोलिस ठाण्यात फरार झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तेव्हापासून पोलिस त्याचा शोध घेत होते. त्याच्याबाबत माहिती मिळाल्यावरुन गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल, जमादार शिवाजी झिने, शेख बाबर, पोलिस नाईक राजेंद्र साळुंके, संजय जाधव, प्रकाश चव्हाण, प्रभाकर राऊत, नितीन देशमुख व संदीप क्षीरसागर यांनी मालेगावातून त्याला अटक केली. विशेष म्हणजे तो वेशभूषा बदलून गेल्या बारा वर्षांपासून मालेगावात राहत होता.
………
वॉरंटमधील महिला गुन्हे शाखेकडून अटक
औरंगाबाद  : दुस-या महिलेच्या नावे महानगर पालिकेकडे कर्ज अनुदान मिळविण्यासाठी बनावट प्रस्ताव सादर करुन बँकेतून रक्कम उचलत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेली महिला २००६ पासून फरार होती. न्यायालयाने तिच्या नावे वॉरंट जारी केले होते. तिला ३० नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. दैवशाली देविदास झिने (४८, रा. आनंद गाडेनगर, नारेगाव) असे तिचे नाव आहे.
एका महिलेच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करुन दैवशाली झिने हिने महानगर पालिकेकडे कर्जाच्या अनुदानाची फाईल सादर केली होती. त्या बनावट कागदपत्राआधारे तिने बँकेतून ४७ हजार पाचशे रुपयांचे अनुदान लाटले होते. हा प्रकार उघडकीस आल्यावर २००६ साली तिच्याविरुध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, दैवशाली झिने हिने २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत पुर्व मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याचदरम्यान न्यायालयाने तिच्याविरुध्द वॉरंट जारी केले होते. मात्र, नावात फरक असल्याने तिला अटक करण्यात आली नव्हती. सिटीचौक पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवर दैवशाली झिनेविरुध्द गुन्हा दाखल असल्याचे समोर आल्यावर आज तिच्या घरावर छापा मारुन गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल, जमादार शिवाजी झिने, शेख बाबर, पोलिस नाईक राजेंद्र साळुंके, संजय जाधव, प्रकाश चव्हाण, प्रभाकर राऊत, नितीन देशमुख व संजीवनी शिंदे यांनी तिला पकडले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!