Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन , पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह यांच्यासहित देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

Spread the love

राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर शिवतीर्थावर कोणतीही भाषणबाजी न करता थेट सिद्धीविनायक मंदिरात जाऊन विघ्नहर्त्या गणेशाचं दर्शन घेतलं आणि सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीला सुरुवात केली. अवघ्या दोन तासातच उद्धव ठाकरे यांनी कामाला सुरुवात केली. त्यामुळे आगामी काळात ठाकरे सरकार अधिक सतर्क आणि क्रियाशील राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर अनेक मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन. ते राज्याच्या कल्याणासाठी अत्यंत परिश्रमपूर्वक काम करतील, याची मला खात्री आहे’, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे. “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन. राज्यातील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याबरोबरच ते विकासाच्या रस्त्यावरून महाराष्ट्राला पुढं घेऊन जातील अशी अपेक्षा मला आहे, असं ट्विट राजनाथसिंह यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. शिवाय या शपथविधीला ते उपस्थितही होते. ‘शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेजी यांनी मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेतली. त्याप्रसंगी उपस्थित होतो. त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा’, असं ट्वीट त्यांनी केलं.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ट्वीट करत उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील कल्याणकारी शासन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला दिले. उद्धव ठाकरे यांनीही आता जनतेच्या हिताचे सरकार अस्तित्वात आणावे, ही अपेक्षा आणि त्यासाठीच शुभेच्छा,’ असं ट्वीट त्यांनी केलं.

माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. ‘बाळासाहेबांच्या स्वप्नांना व मराठी माणसाला असलेल्या अपेक्षा आपण पूर्णत्वाकडे न्याल व पदा सोबत आलेल्या सत्ता व संघर्ष याचा योग्य मेळ कराल ही ईश्वर चरणी प्रार्थना. आदरणीय व प्रिय उद्धवजी यांना मनःस्वी शुभकामना!! एका ठाकरेंनी पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि एक मुख्यमंत्री झाले..हार्दिक अभिनंदन!! महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरा हीच आहे ‘राज्याचे हित प्रथम ‘!! राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांना राज्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!’ आदरणीय बाळासाहेबांच्या स्वप्नांना व मराठी माणसाला असलेल्या अपेक्षा आपण पूर्णत्वाकडे घेऊन जाल हीच ईश्वर चरणी प्रार्थना,’ असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!