Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे राजकारण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह प्रत्येकी दोन मंत्री घेतील शपथ, विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसला आणि उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे

Spread the love

महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली असून, ते उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. महाआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागेल आणि खातेवाटप कसं असेल याबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे. आगामी दोन दिवसांत खातेवाटपाबाबत ठरणार आहे, असं सांगण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन-दोन मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे. आज झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

महाराष्ट्र विकास आघाडीचं सत्तासूत्रं अखेर ठरलं आहे. राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद तसेच विधानसभेचं उपाध्यक्षपद आणि काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल याांनी दिली. उद्या शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आघाडीच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आजच्या बैठकीत महामंडळं, कोअर कमिट्या, विधान परिषदेतील सदस्यत्व आदींबाबत सखोल चर्चा करून त्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याचेही  पटेल म्हणाले.

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे, शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यासह तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

उपलब्ध माहितीनुसार, या नव्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील असे सांगण्यात येत आहे. त्यात काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. दुसरीकडे अजित पवार यांची या सरकारमध्ये काय भूमिका असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. खातेवाटपाबाबत काँग्रेस नेते थोरात यांनी माहिती दिली आहे. खातेवाटपाबाबत आगामी दोन दिवसांत ठरेल. तसंच कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदे कोणत्या पक्षाला किती द्यायची याबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असं थोरात यांनी सांगितलं.

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील असं सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील यांची नावे चर्चेत आहेत. याबाबत थोरात यांना विचारलं असता, उपमुख्यमंत्रिपदाबाबत अजून निर्णय व्हायचा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!