महाराष्ट्राचे सत्ताकारण : राज्यपालांचे उद्धव ठाकरे यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण , बहुमत सिद्ध करण्यासाठी दिला इतका अवधी…

Advertisements
Advertisements
Spread the love

अखेर महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेची बदलती परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेना -काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस , इतर मित्रपक्ष आणि अपक्षांच्या वतीने सत्ता स्थापनेचा दावा करताच  महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. गुरुवार दि. २८ नोव्हेंबर रोजी दादर येथील शिवतीर्थावर सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी उद्धव यांना राज्यपाल मुख्यमंत्रिपदाची शपथ देणार आहेत. दरम्यान, उद्धव यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी ७ दिवसांची म्हणजेच ३ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Advertisements

आज रात्री महाविकास आघाडीच्या वतीने युवासेनाप्रमुख व नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते सुभाष देसाई व अन्य प्रमुख नेत्यांनी राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आणि उद्धव ठाकरे हे आमच्या आघाडीचं नेतृत्व करतील, असं यावेळी सांगण्यात आलं. हा दावा राज्यपालांनी स्वीकारला असून लगेचच उद्धव यांना सत्तास्थापनेसाठी पाचारण केलं आहे.

Advertisements
Advertisements

राज्यपालांनी  उद्धव ठाकरे यांना सत्ता स्थापनेबाबत पत्र दिले असून त्यात म्हटले आहे कि ,  महाविकास आघाडीकडे १६६ आमदारांचं संख्याबळ असल्याचं आघाडीकडून सादर करण्यात आलेल्या समर्थन पत्रांतून स्पष्ट होत आहे. त्यानुसार मी आपणास सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करत आहे,  २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी दादर येथील शिवाजी पार्क मैदानात हा शपथविधी सोहळा पार पाडण्यात येईल, असेही राज्यपालांनी पुढे स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरे हे विधानसभा व विधान परिषद अशा विधीमंडळाच्या दोनपैकी एकाही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून पुढील सहा महिन्यांच्या आत विधीमंडळाचे सदस्य म्हणून निवडून यावे लागणार आहे. घटनेनुसार तो दंडक आहे. त्याबाबतही राज्यपालांनी उद्धव यांना सूचित केलं आहे.

दरम्यान महाविकास आघाडीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना ‘हीच ती वेळ’ असा संकल्प बोलून दाखवला. शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे या तीन नेत्यांमुळे महाराष्ट्रात नवी आघाडी स्थापन झाली आहे. ‘हीच ती वेळ आणि हीच ती संधी’ हे आम्ही अवघ्या देशाला आज दाखवून दिले आहे. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी एकत्र आलो आहोत. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने आम्ही निश्चितच राज्याला स्थिर सरकार देऊ, असा विश्वास आदित्य यांनी यावेळी व्यक्त केला. महाविकास आघाडीला सत्तास्थापनेची संधी दिल्याबद्दल आदित्य यांनी राज्यपालांचे आभार मानले.

आपलं सरकार