Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे राजकारण : महाविकास आघाडीच्यावतीने उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना भेटून केला सत्ता स्थापनेचा दावा

Spread the love

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज रात्री उशिरा राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. येत्या १ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे हे शिवतिर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे वृत्त आहे.

आज रात्री हॉटेल ट्रायडंटमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे राजभवनाकडे गेले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे विधीमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेही होते. राजभवनात गेल्यावर या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी एक तासाहून अधिक काळ चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्यपालांना पाठिंबा असणाऱ्या आमदारांची यादी सादर करून सत्तास्थापनेचा दावाही केला, असं वृत्तं पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

आज सायंकाळी हॉटेल ट्रायडंट येथे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी महाविकासआघाडीच्या नेतेपदी आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असावे असा ठराव मांडला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी हा ठराव एकमताने मंजूर केला. त्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अनुमोदन दिले.

दरम्यान उद्धव ठाकरे १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवतिर्थावर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना ठाकरे-पवार कुटुंबाच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा देतानाच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचेही आभार मानले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!