Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Spread the love

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेतून देवेंद्र फडणवीस आणि भाजपने सपशेल माघार घेतल्यानंतर शिवसेना -काँग्रेस -राष्ट्रवादीच्या महा विकास आघाडीला सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून आघाडीच्या बैठकीत आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. येत्या १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवतिर्थावर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारे उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातील पहिले  व्यक्ती ठरणार आहेत.

आज सायंकाळी हॉटेल ट्रायडंट येथे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते..

यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विशेष आभार मानले. तसेच शिवसेना वाढवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आयुष्य वेचले त्या शिवसैनिकांच्या स्मृतींनाही त्यांनी उजाळा दिला.

उपस्थितांचे आभार मानताना उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिला कि , आपलं सरकार एका कुटुंबासारखं काम करेल. जनतेला हे सरकार आपले  वाटेल असे काम आपण करून दाखवू. आपण चांगला महाराष्ट्र आणि सुसंस्कृत महाराष्ट्र घडवू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवू, असे सांगतानाच माझे सरकार कुणाशीही सुडबुद्धीने वागणार नाही. पण कुणी आडवे  आले तर त्याला बघून घ्यायला माझे वाघ तयार आहेत. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून माझ्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असलं तरी तुम्ही सर्वच माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री आहात. हे केवळ माझं सरकार नसेल तर आपलं सरकार असेल. हे आपलं सरकार आहे ही भावना जनतेच्या मनात निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असं सांगतानाच मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला अनेक काटे असतात. अनेक खिळेही असतात. जाणारा मुख्यमंत्री दोनचार खिळे लावून जात असतो. कितीही खिळे लावले तरी हातोडा मात्र माझ्या हातात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

महा आघाडीविषयी बोलताना ते म्हणाले कि , आज आम्ही तीन दिशेला असणारे पक्ष एकत्र आलो आहोत. एकमेकांवर विश्वास ठेवून आपण महाराष्ट्राला वेगळी दिशा देणार आहोत, असं सांगतानाच ज्यांच्याशी ३० वर्ष मैत्री केली. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही. पण ज्यांच्याशी ३० वर्ष सामना केला. त्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, असं ते म्हणाले. आयुष्यात काय कमावले आणि काय गमावले याचा विचार करण्याचा हा प्रसंग नाही. हे शिवधनुष्य आहे आणि तुमच्या साथीने हे शिवधनुष्य पेलायचे आहे, असंही ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!