Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे राजकारण : अजित पवार यांची आता माघार नाही , मानले मोदी आणि भाजप नेत्यांचे आभार , मी राष्ट्रवादीतच , शरद पवार साहेब हेच माझे नेते…

Spread the love

‘मी राष्ट्रवादीतच असून आदरणीय शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी मिळवून जनतेच्या कल्याणासाठी पुढील पाच वर्ष स्थिर सरकार देऊ’, असं ट्वीट अजित पवार यांनी केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्याच मदतीने पुढचं सरकार बहुमत सिद्ध करणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

अजित पवारांनी पहिल्यांदाच मौन सोडत एकापाठोपाठ एक १६ ट्वीट केले. यात पहिलं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी होतं. पंतप्रधान मोदींचे आभार मानत राज्यात जनतेच्या कल्याणासाठी स्थिर सरकार देऊ, अशी ग्वाही अजित पवार यांनी मोदींना दिली. याशिवाय त्यांनी भाजपच्या इतर नेत्यांसह गृहमंत्री अमित शाह यांचेही आभार मानले.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात राष्ट्रवादीकडून भाजपच्या गोटात जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या परतीच्या शक्यता मावळल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरही आता उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला असून त्यांनी आपल्या ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी  अजित पवार यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्याबद्दल आता अजित पवार यांनी मोदींचे आभार मानले आहेत.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपले आभार. महाराष्ट्रात स्थिर सरकार कायम ठेवून आम्ही महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करू,’ असा विश्वास ट्विट करून अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांना दिला आहे. अजित पवार यांनी नरेंद्र मोदींसह त्यांना शुभेच्छा दिलेल्या सर्वच भाजप नेत्यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनधरणी केल्यानंतरही अजित पवार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!