Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे राजकारण : शिवसेना आमदारांची २२ ला तर काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक

Spread the love

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सगळ्या आमदारांची २२ नोव्हेंबरला  बैठक बोलावली आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. महाराष्ट्रातला सत्तापेच काही केल्या सुटत नाही असेच चित्र आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अशात आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २२ नोव्हेंबरला मातोश्रीवर सगळ्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत नेमके काय ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: मार्गदर्शन करणार असून सर्व आमदारांना येताना पाच दिवसाचे कपडे, आधार आणि पॅनकार्ड घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यात सत्तास्थापन करण्याच्या दिशेने हालचाल करत असल्याचे संकेत मिळत असून या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही काँग्रेससोबत जाण्यासाठी शिवसेनेने केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामाही दिला आहे. शिवाय एनडीएतूनही शिवसेनाबाहेर पडली आहे. त्यामुळे शिवसेनेला संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी बाकांवर स्थान देण्यात आलं आहे. त्याशिवाय तिन्ही पक्षांनी मिळून किमान समान कार्यक्रमाचा मसुदाही तयार केला आहे. मात्र शिवसेनेसोबत जाण्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अद्यापही थेट भाष्य केलेलं नाही. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून अद्यापही संभ्रम निर्माण झालेला आहे. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात? आमदारांना काय सूचना देतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान शुक्रवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी ही बैठक होणार असल्याचं शिवसेनेचे मुख्यप्रतोद सुनील प्रभू यांनी सांगितलं. यावेळी राज्यातील सत्तापेचाबरोबरच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचाही आढावा घेतला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचीही आमदारांकडून माहिती घेतली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

शिवसेनेने सर्व आमदारांना येताना आधार आणि पॅनकार्डसह पाच दिवस पुरेल एवढे कपडे घेऊन यायला सांगितले आहे. आमदारांची राज्यपालांसमोर ओळख परेड करण्याची वेळ आली तर आधारकार्ड आणि पॅनकार्डद्वारे ओळख पटवता येऊ शकते, म्हणून या आमदारांना ओळखपत्र घेऊन येण्यास सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं. दिल्लीत सत्तेस्थापनेबाबतच्या वेगवान हालचाली होत आहेत. दोन-चार दिवसात त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा आमदारांना मुंबईत बोलवावे लागण्याची शक्यता असल्याने त्यांना थेट कपडेच घेऊन यायला सांगितले आहे. त्यामुळे या आमदारांना मुंबईतच पुन्हा अज्ञातस्थळी ठेवण्यात येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

 

काँग्रेस राष्ट्रवादीची उद्या बैठक

दरम्यान आज न झालेली काँग्रेस -राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची दिल्लीतील बैठक उद्या दिल्लीत होणार असून या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वतः शरद पवार , प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि काँग्रेसकडून अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे , पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि इतर नेत्यांची उपस्थिती राहील.

या बैठकीत महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्ता स्थापनेच्या पेचावर चर्चा होईल असे सांगण्यात येत आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!