Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे राजकारण : महाशिवआघाडीच्या नेत्यांनी पुढे ढकलली राज्यपालांची भेट

Spread the love

संभाव्य महाशिवआघाडीच्या नेत्यांना  आजची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट तुर्तास पुढे ढकलावी लागली आहे. आज सायंकाळी साडेचार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार होते. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर अभूतपूर्व असे संकट कोसळले असून या स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यपालांनी ठोस पावले उचलावीत, अशी विनंती या भेटीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते  शिवाय ज्या मागणीसाठी या तिन्हीही पक्षांचे नेते जाणार होते त्यापैकी एक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आज राज्यपालांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे.

दरम्यान आज आघाडीचे नेते जाहीर न करता सत्ता स्थापनेचा दावा करतील असा कयास बांधला जात होता परंतु सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेली  १४५ आमदारांच्या पाठिंब्याची यादी हातात नसल्याने आणि शरद पवारांनी त्यासाठी आणखी वेळ लागणार असल्याचे सांगितल्याने हि भेट पुढे ढकलण्यात आली  असावी असा अंदाज आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला उद्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनी नवे सरकार अस्तित्वात येईल आणि शिवतीर्थावर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल असे वाटत होते परंतु तसे काहीही झाले नाही. त्यामळे शिवसैनिकांची नक्कीच निराशा झाली असणार. या पार्श्वभूमीवर उद्या शरद पवार यांची सोनिया गांधी यांची भेट झाल्यावरच याचा खुलासा होऊ शकेल असे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिन्ही पक्षांनी निश्चित केलेली आजची राज्यपालांची भेट रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्याकडूनही या माहितीला दुजोरा देण्यात आला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते आणि आमदार सध्या ओला दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. नुकसानीचे पंचनामे वेगाने व्हावेत यासाठी सर्वांचे प्रयत्न आहेत. त्याचवेळी निवडणूक खर्चाचा तपशील आणि अन्य बाबींची पूर्तता करायची असल्याने मतदारसंघात थांबावे लागले आहे. त्यामुळेच आजची राज्यपालांची नियोजित भेट तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत राज्यपालांची नव्याने वेळ घेऊन भेट घेण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.

राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचे राज्यातील प्रमुख नेते राज्यपालांची राजभवनात भेट घेणारअसल्याची  माहिती शुक्रवारी  दिली होती. अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे राज्याच्या सर्वच भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना सरकारकडून कसलीच मदत मिळाली नाही. यापूर्वीच्या मावळत्या सरकारने सुमारे १० हजार कोटींची मदत देण्याचे जाहीर केले असले तरी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अर्धवट आहे. शेतीतील उभ्या पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन जगण्याचा खर्च चालविणे अवघड झाले आहे. त्यामुळे राज्यपालांनी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना तातडीने रोख मदत ताबडतोब द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले होते. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याबरोबरच पीकविम्याची भरपाई मिळावी. रब्बी हंगामाच्या पिकांसाठी नवीन कर्ज, बी-बियाणांचा आणि खतांचा पुरवठा करण्यात यावा, असेही राज्यपालांच्या कानावर घातले जाईल, असेही ते म्हणाले होते. मलिक यांच्या राज्यपाल भेटीच्या माहितीला काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुजोरा दिला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!