Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे राजकारण : देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम

Spread the love

राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेचे नवीन समीकरण तयार करीत असतानाच मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी , भाजपशिवाय कोणाचेही सरकार येऊ शकत नाही. राज्यातील सध्याची परिस्थिती अशीच आहे, असे  वक्तव्य केल्याने भाजपकडून नेमक्या काय हालचाली सुरु आहेत या विषयी राजकीय वर्तुळात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे .

देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही हरत चाललेली मॅचही जिंकली जाऊ शकते असे प्रतिपादन केले आहे . भाजप नेत्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.

दादरच्या भाजप कार्यालयात भाजपच्या आणि भाजप समर्थक आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य करतानाच शिवसेनेवरही दोषारोप केले. भाजपच्या सहभागामुळेच मित्रपक्षांना जास्त जागा जिंकता आल्या. भाजपचे नेते शिवसेनेच्या अनेक मतदारसंघात प्रचारासाठी गेले. या उलट शिवसेनेचा एकही नेता भाजप उमेदवारांच्या मतदारसंघात प्रचारासाठी आला नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजप वगळता राज्यात कोणतंही सरकार स्थापन होऊ शकत नाही, अशीच सध्याची राजकीय परिस्थिती आहे. योग्यवेळी पक्ष निर्णय घेईल, असंही ते म्हणाले.

दरम्यान  फडणवीस यांनी सर्व आमदारांना मुंबईत न जाण्याचे आदेश दिले. आमदारांनी जनतेत जाऊन काम करावे. मुंबईत थांबण्याची गरज नाही. शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना दिलासा द्यावा, शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांना भक्कम मदत मिळेल, हे निश्चित आहे. सत्तेसाठी भाजप काम करीत नसून, जनतेसाठी काम करणे, हे आपले पहिले लक्ष्य आहे, असे ते म्हणाले. या निवडणुकीत भाजपला अतिशय भक्कम यश प्राप्त झाले. प्रत्येक विभागात भाजपला यश आले असल्याचंही त्यांनी सांगितलं. नेतृत्वावर विश्वास असलेला भाजप हा एकमेव राजकीय पक्ष आहे. आम्हाला आमदार कुठेही पाठवायची वेळ आली नाही, असा टोलाही त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसला नाव न घेता लगावला.

राज्यात सध्या सत्तास्थापनेची घाई सुरू आहे. या सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर आमचं लक्ष आहे, अशी टीका भाजपचे नेते, आशिष शेलार यांनी केली. यावेळी त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘मुख्यमंत्रिपदाचे घोषित उमेदवार’ असा केला. पुढील तीन दिवस भाजपचे सर्व आमदार राज्‍यात अवकाळी पावसाने अडचणीत आलेल्‍या शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा देण्यासाठी जाणार असल्‍याचे शेलार यांनी सांगितले. भाजपच्या संघटनात्‍मक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाला आहे. राज्‍यातील ९० हजार बूथवर भाजपचे सर्व आमदार भेट देणार आहेत. अडचणीत सापडलेल्‍या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याचेही ते म्हणाले. भाजपची तीन दिवसीय चिंतन बैठक दादरच्या भाजपच्या वसंतस्‍मृती कार्यालयात आज पार पडली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!