Maharashtra politics : राज्यात महाशिवआघाडी स्थापन करण्यासाठी हालचाली , सोनिया गांधींच्या निर्णयाकडे लक्ष !!

Spread the love

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप -सेनेची महायुती तुटल्यात जमा असून काँग्रेस -राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या त्रिकुटातून आता महाशिव आघाडी स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाली असल्याचे वृत्त आहे . त्यामुळे या नव्या समीकरणाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मान्यता दिली तरच या वृत्ताला दुजोरा मिळणार आहे.  भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे मन वळविण्यास शरद पवार  यशस्वी होतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राज्यातील काही काँग्रेसचे नेते मात्र शिवसेनेच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्यास तयार असल्याचे सांगितले जात आहे.


काँग्रेसच्या पाठिंब्याच्या मेख अशी आहे कि , एक तर सोनिया गांधी तयार होतील पण त्यासाठी शिवसेनेला आधी एनडीए तुन बाहेर पडून भाजपशी पूर्ण काडीमोड घ्यावा लागेल. आणि केंद्रातील मंत्रिपदेही सोडावी लागतील शिवसेनेला हे सत्तेचे नवे समीकरण परवडणारे आहे काय ? हा खरा प्रश्न आहे.


दरम्यान राज्यपालांनी सत्ता स्थापनेचे आमंत्रण भाजपाला दिले असल्याने त्यावर भाजपकडून लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे . भाजप-शिवसेनेतील सत्तावाटपाच्या वादामुळं राजकीय तिढा निर्माण झाल्यानंतर भाजपकडून आमदार फोडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळं खबरदारी म्हणून काँग्रेसनं आपल्या आमदारांना जयपूर इथे हलवले आहे. तर शिवसेनेचे आमदारही कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आणि उद्धव ठाकरे यांच्या निगराणीत आहेत . काँग्रेसचे राज्यातील दिग्गज नेतेही आज जयपूरला पोहोचल्यानंतर या ठिकाणी त्यांची आमदारांसोबत बैठक झाली या बैठकीत अपवाद वगळता बहुतांश आमदारांनी शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्यास हरकत नसल्याचे मत दिले. शिवसेनेला पाठिंबा देऊन सत्तास्थापनेसाठी हालचाली न केल्यास भारतीय जनता पक्ष विरोधकांचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करू शकतो. याआधीही भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार व नेते फोडले आहेत. त्याची पुनरावृत्ती करण्याची संधी भाजपाला देऊ नये, अशी भावना या बैठकीत काही आमदारांनी व्यक्त केली.

या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, अविनाश पांडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे यावेळी उपस्थित होते. त्यामुळं भाजपला वगळून राज्यात सत्तेचं नवं समीकरण आकाराला येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र याची सर्व दारोमदार काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महाआघाडीचे सरकार आल्यास सत्तेचं वाटप कसे  करायचे , याचा फॉर्म्युला ठरविला जात आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, २५ मंत्रिपदे शिवसेनेला, उर्वरीत राष्ट्रवादीला व विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला असा हा फॉर्म्युला राहील असे सांगितले जात आहे.

आपलं सरकार